
कसबा तारळेत सकाळ तनिष्काच्या वतीने आरोग्य मार्गदर्शन
02102
‘सकाळ’ तनिष्कातर्फे संक्रांतीला
आरोग्यविषयक मार्गदर्शनाचे वाण
कसबा तारळे, ता. १७ ः महिला जशा दागदागिन्यांची जीवापाड काळजी घेतात तशीच आरोग्याची काळजी घेताना दिसत नाहीत. ती त्यानी घ्यावी. आरोग्यच चांगले नसेल तर त्या दागिन्यांचा काहीही उपयोग नाही. म्हणूनच महिलांनी व्यायाम, पौष्टीक आहार व्यवस्थित घेवून आरोग्य सांभाळलं पाहिजे. ‘ती’च कुटुंबाचा आधार असते. ‘ती’च जर आजारानं अंथरूणावर पडली तर सारं कुटुंब कोलमडून जातं. यासाठी त्यांनी योगासनांच्या माध्यमातून, पौष्टीक अन्नधान्य घेवून तब्येत खणखणीत ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन आरोग्यसेविका समृध्दी प्रभू यानी केले. त्या कसबा तारळे (ता. राधानगरी) येथे ‘सकाळ’ तनिष्का गटातर्फे हळदी-कुंकू तिळगूळ वाटप समारंभात बोलत होत्या. अध्यक्षस्थानी गटप्रमुख वसुधा जाधव होत्या.
यावेळी प्रभू म्हणाल्या, ‘मातांनी मुलींबरोबर मैत्रिणीसारखं वागलं पाहिजे. ठराविक काळात त्यांना मानसिक आधार द्यावा. मुलांना निरोगी ठेवण्यासाठी पालेभाज्या, कडधान्य दिली पाहिजेत. फास्टफूडपासून त्यांना दूर ठेवा. गरोदरपणापासून प्रसूती होईपर्यंत महिलांचा पुनर्जन्म होत असतो. म्हणूनच गरोदरपणात आईची मानसिकता जपली पाहिजे. सकस अन्न द्यावे. असं केले तरच होणारं बाळ सदृढ असं जन्माला येवू शकेल. गटप्रमुख वसुधा जाधव यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, संक्रांतीच्या हळदी-कुंकू समारंभात एखादी वस्तू वाण देण्याची रीत आहे, पण ‘सकाळ’ तनिष्का गटाच्यावतीने आम्ही महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शनाचे वाण भेट म्हणून देत आहोत.’ तनिष्का गटातील महिलांसह गावातील अनेक महिलांनी चांगली उपस्थिती लावली होती.