
आमजाई व्हरवडे ते शिरगाव दरम्यान पूल पूर्णत्वास वाहतूक सुरू
02131-1
भोगावती नदीवरील पूल पूर्णत्वास
वाहतूक सुरू; धामोड, तारळे परिसराची सोय
शिरगाव, ता. ३१ ः आमजाई व्हरवडे ते शिरगावदरम्यान भोगावती नदीवरील मोठा पूल पूर्णत्वास आला आणि त्यावरून वाहतूकही सुरू झाली आहे. यामुळे धामोड, तारळे परीसरातील कामगार, विद्यार्थी, व्यापाऱ्यांचा पावसाळ्यातील प्रश्न मार्गी लागेल.
येथे कोल्हापूर पध्दतीचा बंधारा पाणी अडविण्यासाठी केला असला तरी त्यावरून वाहतूक सुरू होती. अतिवृष्टीमुळे बंधारा पाण्याखाली जात असल्याने लोकांची गौरसोय व्हायची. राशिवडे, तारळेतून वाहतूक होत असे. अरूंद बंधाऱ्यामुळे एकेरी वाहतूक असल्याने वाहतुकीची कोंडी व्हायची. ऊसाची वाहनं, अवजड वाहतुकीमुळे बंधारा कमकुवत झाला होता. म्हणूनच सार्वजनिक बांधकाम विभागाने नाबार्ड योजनेतून साडेपाच कोटी रूपये खर्च करून मोठा पूल बांधला. शिरगाव, आमजाई व्हरवडेपासून बंधाऱ्यापर्यंत चांगला रस्ता रूंदीकरण होणे गरजेचे आहे. बंधारा पूर्ण झाल्याने धामोड खोरा, म्हासुर्ली खोरा, आवळी खुर्द, घुडेवाडी, मुसळवाडी, राशिवडे खुर्द, शिरगाव आदींसह अनेक गावांतील कामगार, विद्यार्थी, व्यापाऱ्यांचा पावसाळ्यातील प्रश्न मार्गी लागेल.
-----------------
चौकट
पावसाळ्यातील गरसोय दूर
पुलाच्या उंचीबाबत संभ्रम होता. मात्र उंची वाढवल्यास रस्ताही उंच होणार. परिणामी पूराच्या पाण्याची फूग मागे सरकून पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता लक्षात घेवून बांधकाम विभागाने पुलाची निर्मिती केली.
कोट
मोठ्या पुलावरून दोन वाहनं सहज जातात. त्यामुळे पूल सोयीचा झाला आहे. पावसाळ्यातील त्रास वाचेल. रस्ता रूंदीकरण व्हायला पाहिजे.
- संग्राम पाटील, राशिवडे खुर्द
पहिला बंधारा कमकुवत होता. रस्त्यावर खड्डेही असल्याने गैरसोय होत होती. पुलामुळे केळोशी परिसरातील लोकांची सोय झाली आहे.
- प्रकाश पाटील, केळोशी खुर्द