मृगाच्या सरींनी शेतकरी सुखावला

मृगाच्या सरींनी शेतकरी सुखावला

02374
पिंपळगाव ः जिल्ह्यात बहुतांश भाताच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकरी आता भुईमूग, नाचणी पिकांच्या मशागतीत व्यस्त आहेत.
.............
मृगाच्या सरींनी शेतकरी सुखावला

भाताच्या धूळवाफ पेरण्या पूर्ण; भुईमूग, नाचणीसाठीच्या तरव्यांची तयारी

सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. १० : गेले चार महिने उन्हाने अंगाची काहिली झाली होती. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर ७ जूनलाचा पावसाच्या सरी बरसल्याने शेतकरी सुखावला आहे. खरिपाच्या पेरण्या, टोकनणी साधल्याने निवांत झाला आहे. राधानगरी तालुक्यात भाताची रोप लागण केली जात असल्याने शेतकरी तरवा टाकण्याच्या तयारी आहेत. काही भागांत पेरण्यांना अवकाश असला तरी डोंगर, माळरानावरील भुईमूग, नाचणी पिकांच्या मशागतीसाठीच्या तयारीत असल्याचे पाहावयास मिळत आहे.
चार महिन्यांच्या कडक उन्हाने सर्वांचाच जीव हैराण होऊन गेला होता. यंदा उन्हाळ्याची दाहकता अधिकच जाणवली. कधी एकदा पाऊस पडतो आणि धरणी शांत होते याची प्रतीक्षा लागली होती. त्यात मॉन्सूनपूर्व पावसाने हुलकावणी दिली होती. अगदी शुक्रवारपर्यंत उकाडा जाणवत होता; पण बघता बघता उन्हाची दाहकता कमी झाली आणि शुक्रवारी रात्रीपासूनच जणू ठरल्याप्रमाणे ७ जूनला मृग नक्षत्राच्या पावसाने हजेरी लावली. शनिवारी दुपारपासून मान्सूनचा पाऊस बरसून लागला आणि हवेत बदल झाला. उन्हाच्या दाहकतेची जागा गारव्याने घेतली.
दुसरीकडे खरिपाच्या धूळवाप पेरण्या साधल्याने बळिराजा सुखावला. आता पेरलेल्या बियाण्याची उगवण चांगली होऊन पुढील मशागतीला वेग येईल. भाताच्या रोप लावणीसाठी तरवा टाकण्यासाठी लगबग सुरू होईल. डोंगरमाथ्यावर भात, भुईमूग टोकनणीसाठी धांदल उडणार आहे. भाताची उगवण चांगली झाली की, बाळ कोळपणी सुरू होतील आणि सारा शिवार भातपिकाने बहरून जाईल. वाळून ओसाड झालेले डोंगरमाथे हिरव्या, पोपटी रंगाने खुलून दिसतील.
........

कौलव परिसरात मशागतीची कामे पूर्ण
शाहूनगर, ता. १० ः कौलव परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतीकामाला वेग आला आहे. खरीप पिकांच्या मशागतीची कामे यापूर्वीच पूर्ण झाली असून, धूळवाफ पेरणीची कामे अंतिम टप्प्यात आहेत. परिसरात वळवाने हुलकावणी दिल्याने डोंगरमाथ्यावरून शेतातील भात पेरणीची कामे खोळंबली होती. त्यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता होती. मात्र मृगाच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण झाली असून भातपेरणीची कामे सुरू आहेत. डोंगरमाथ्यावरील रानातील पेरणीची कामे पूर्ण करण्यासाठी बळीराजाची धांदल उडाल्याचे चित्र आहे. भात पेरणीबरोबरच उसाची भांगलण करून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.
...
चौकट...
पिंपळगाव परिसरात भुईमूग, नाचणीसाठी मशागत सुरू

पिंपळगाव, ता. १० ः पिंपळगाव परिसरात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना गती आली आहे. परिसरातील मानवळे, मुरुक्टे, दिंडेवाडी शिवारात खरीप भाताची पेरणी पूर्ण झाली आहे. भुईमूग, नाचणी पीकक्षेत्रात मशागतीची कामे सुरू आहेत. भुदरगड किल्ल्याच्या तटबंदीजवळील जोगेवाडी, गडबिद्री, जकिनपेठ, मानवळे येथे खरीप नाचणी, भुईमूग पेरणीपूर्व मशागत कामे सुरू आहेत. परिसरात सलग दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने बळिराजा सुखावला आहे.
.........

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com