

06076
शिरगाव : यंत्राद्वारे रोप लावणीसाठी चिखल करताना शेतकरी.
सर्जा-राजाच्या घुंगरांऐवजी
शिवारात ट्रॅक्टरचाच आवाज
शेतीत यांत्रिकीकरण वाढले ; बैल पाळण्याचा खर्चही वाढला
राजू कुलकर्णी : सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. १३ : शेतीकामांसाठी रात्रंदिवस आपल्या धन्यासोबत इमाने इतबारे काबाडकष्ट करणारी सर्जा-राजाची जोडी आता शेतातून हळूहळू कमी होताना दिसत आहे. वाढती महागाई, चाऱ्याचा तुटवडा आणि बैलजोडी सांभाळण्याचा लागणारा मोठ्या खर्चामुळे ग्रामीण भागात बैलांची संख्या घटली आहे. परिणामी, पारंपरिक शेतीची जागा आता वेगाने यांत्रिक शेतीने घेतली आहे.
शिवारात आता सर्जा-राजाच्या गळ्यातील घुंगरांच्या आवाजाऐवजी ट्रॅक्टरसह यंत्रांचा आवाजच अधिक ऐकायला मिळत आहे.
बैलांच्या मदतीने नांगरणी, कोळपणी किंवा पेरणी करण्यासाठी कित्येक दिवसांचा कालावधी लागायचा. मात्र, ट्रॅक्टर, रोटर, पेरणीयंत्र आणि कापणी यंत्रांमुळे दिवसभराचे काम काही तासांत पूर्ण होत आहे.वेळ, श्रम आणि पैशांची बचत करण्यासाठी शेतकरी आता यांत्रिक शेतीलाच पसंती देत आहेत.
ज्या लहान शेतकऱ्यांकडे स्वतःचा ट्रॅक्टर किंवा आधुनिक यंत्रे नाहीत, ते भाडेतत्त्वावर ट्रॅक्टर व इतर साधने आणून शेतीची कामे उरकून घेत आहेत. मात्र, बैलांच्या शेणखतामुळे जमिनीला मिळणारे सेंद्रिय पोषण आता कमी होत आहे. काळाची गरज ओळखून शेतकरी यांत्रिकीकरणाकडे वळला असला, तरी शेतात राबणाऱ्या सर्जा-राजाची जागा कोणतीही यंत्रे पूर्णपणे घेऊ शकत नाहीत, अशी हळहळही जुन्या जाणत्या शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
-------------
कोट
बैलांसारखी शेताची मशागत यंत्राने होत नाही. मी २५ वर्षे बैलं सांभाळली, धरणीमातेची सेवा केली. पैरा पद्धतीने मशागतीची कामे केली. त्याकाळी पैसे मिळत नव्हते, मात्र पै-पाहुण्यांत एकमेकांची कामे करून सहकार्य करायचे. काळ बदलला आहे. माणसंच यंत्रासारखी झाली आहेत.
- नारायण पाटील, आवळी बुद्रुक, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.