त्यांच्या अभिनयाला सामाजिक बांधीलकीची झळाळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्यांच्या अभिनयाला सामाजिक बांधीलकीची झळाळी
त्यांच्या अभिनयाला सामाजिक बांधीलकीची झळाळी

त्यांच्या अभिनयाला सामाजिक बांधीलकीची झळाळी

sakal_logo
By

02426
जेलुगडे ः नाटकातून मिळालेली रक्कम शाळा, अंगणवाडी व मंदिरासाठी वस्तूरूपात देण्यात आली.
----------------------------------------

‘त्यांच्या’ अभिनयाला सामाजिक बांधिलकीची झळाळी
---
जेलुगडे ग्रामस्थांचा स्तुत्य उपक्रम; नाटकातून मिळालेल्या रकमेतून सार्वजनिक संस्थांना मदत
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २४ ः जेलुगडे (ता. चंदगड) येथे वार्षिक यात्रोत्सवात सादर केलेल्या नाटकाला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेतून गावातील शाळा, अंगणवाडी व मंदिरासाठी आवश्यक साहित्य खरेदी करून ते त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. कोकण सीमेवरील दुर्गम गावातील कलाकारांनी सामाजिक बांधिलकीला दिलेले महत्त्व त्यांच्या अभिनयाएवढेच झळाळून गेले.
जेलुगडे हे गोवा सीमेवरील दुर्गम गाव. चारही बाजूंनी जंगलाने वेढलेले. परंपरा आणि संस्कृती जोपासणारे. नोकरी, व्यवसायाच्या निमित्त येथील अनेक जण शहरात स्थायिक झाले. परंतु, विविध सण, उत्सव साजरे करण्यासाठी ते गावाकडे येतात. दरवर्षीच्या यात्रोत्सवाला बहुतांश ग्रामस्थ हजेरी लावतात. या यात्रेत स्थानिक कलाकारांनी नाटक सादर करायचे, अशी परंपरा आहे. या वर्षीही ती पाळण्यात आली. बहुतांश धार्मिक नाटके केली जात. या वर्षी ३५ वर्षांनंतर व्यंकोजी वाघ हे ऐतिहासिक नाटक सादर केले. अध्यक्ष अशोक नार्वेकर, निर्माते एकनाथ गावडे, दिग्दर्शक एल. आर. गावडे यांच्या मार्गदर्शनाने शशिकांत गावडे, महेश गावडे, जकोबा गावडे, परशराम गावडे, सूर्यकांत बांदिवडेकर, दीपक गावडे, गावडू गावडे, मोहन गडेकर, परशराम नार्वेकर, श्रीपत चव्हाण, गीता पाठक, विनायक गावडे, सूर्यकांत चव्हाण, एम. के. गावडे, रामू नार्वेकर, शेखर गावडे, एकनाथ गावडे, विश्वनाथ नार्वेकर, अशोक चव्हाण, अजित गावडे, सुधाकर बांदिवडेकर, नंदकुमार पाटील यांनी अभिनय कौशल्य सादर केले. त्याला उपस्थित ग्रामस्थांनी दाद देत पैशांच्या स्वरूपात बक्षिसी दिली. जेथे आपल्यावर संस्कार घडले, ती अंगणवाडी, शाळा आणि गावचे दैवत भावईदेवीला आवश्यक साहित्य देण्याचा निर्णय कलाकारांनी घेतला. खुर्ची, कपाट आदी साहित्य संबंधितांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.