पारगडवर एक दिवस आड चार घागरी पाणी

पारगडवर एक दिवस आड चार घागरी पाणी

02706
पारगड : कोरडा पडलेला गडावरील तलाव.
---------------------------------------
पारगडवर एक दिवस आड चार घागरी पाणी
१५० लोकवस्ती; तीन तलाव कोरडे, विहीरीचा आधार
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १ : किल्ले पारगड येथे पंधरा दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. गडावरील तिन्ही तलाव कोरडे पडले आहेत. सुमारे तीस कुटुंबं आणि  दीडशे लोकवस्ती असलेल्या नागरिकांना एका विहिरीचा आधार आहे. पाण्याचा स्रोत विचारात घेता प्रति कुटुंबाला एक दिवस आड चार घागरी पाणी मोजून घ्यावे लागत आहे.
कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर असलेला हा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील दक्षिणेकडचा शेवटचा किल्ला. गोव्याच्या पोर्तुगीजांवर लक्ष ठेवण्यासाठी किल्ल्याचा वापर होत असे. दक्षिण दिग्विजयावेळी छत्रपतींनी हा किल्ला ताब्यात घेतल्यानंतर काही निवडक मावळ्यांना येथे सेवेत रुजू केले. चंद्र, सूर्य असेपर्यंत या गडाची रखवाली करा, असा आदेश बजावला. आज तेरावी पिढीही महाराजांचा आदेश पाळत आहे. चंदगड या तालुक्याच्या मुख्य ठिकाणापासून ४० किमीवर अत्यंत दुर्गम स्थितीत वसलेल्या या किल्ल्यावर आजही लोकवस्ती आहे. शिक्षण, आरोग्य, नोकरी आदी समस्या आहेतच. मात्र जगण्यासाठी आवश्यक असलेले पाणीही संघर्ष करून मिळवावे लागते. दरवर्षी फेब्रुवारीनंतर येथे टंचाईला सुरुवात होते. गडाची उंची विचारात घेता येते नळपाणी योजना राबवणे अवघड आणि खर्चिक आहे. मात्र ''जिथे माणूस तिथे पाणी'' हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या शासनाने येथील नागरिकांची पाण्याची तहान भागवणे गरजेचे आहे. यासंदर्भात सातत्याने निवेदने, उपोषण आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधले आहे. मात्र शासनाकडून केवळ आश्वासने दिली जात असल्याने नागरिक वैतागले आहेत.
--------------
पाहुणचार करता येत नसल्याचे शल्य
गडावर दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. गड चढून आल्यावर त्यांना पाण्याची गरज असते. मात्र साधे पाणी देऊन त्यांचा पाहुणचार करता येत नाही हे शल्य इथल्या ग्रामस्थांना टोचत आहे.
--------------
गडावरील घोडावाटेची दुरवस्था झाल्याने टँकर मागवायचा म्हटला तरी शक्य नाही. नामखोलच्या हद्दीतून पाणी आणणारी योजना प्रस्तावित आहे. ती किमान पुढील वर्षी अमलात यावी यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने गतिमान काम करणे गरजेचे आहे.
- रघुवीर शेलार, ग्रामस्थ, पारगड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com