
काजू गोदामाला आग
02809
आमरोळी: येथील काजू गोदामाला लागलेल्या आगीत झालेले नुकसान.
-----
आमरोळीत वीज कोसळून
काजू कारखान्याला आग
९० लाखांचे नुकसानः काजू बियांची पोती आगीच्या भक्ष्यस्थानी
चंदगड, ता. २९ : आमरोळी (ता. चंदगड) येथील श्रीराम शेती माल सहकारी प्रक्रिया संस्थेच्या काजू कारखान्याला आग लागली. यात सुमारे ९० लाखांचे नुकसान झाले. गडहिंग्लज येथील अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.
रविवारी (ता. २८ ) सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याचवेळी कारखान्याच्या गोदामावर वीज कोसळली. काजूच्या पोत्यांनी पेट घेतला. हळूहळू आगीने रौद्ररूप धारण केले. यामध्ये सुमारे ८०० ते ९०० काजू बीची पोती, छतावरील सिमेंटचे पत्रे, लाकडी खांब आदी साहित्य जळून खाक झाले. आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, गडहिंग्लजहून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली. तलाठी रुपाली कांबळे, पोलिस पाटील मारुती नाईक,धोंडीबा नाईक, विजयकुमार कांबळे, उत्तम वाईगडे, सुरेश वाइंगडे, प्रकाश वाइंगडे यांनी पंचनामा केला. कारखान्याचे अध्यक्ष पांडुरंग मंडलिक यांनी घटनेची वर्दी पोलिसात दिली.