ढोलगरवाडीतील सर्प प्रदर्शनाला बंदी

ढोलगरवाडीतील सर्प प्रदर्शनाला बंदी

03258
ढोलगरवाडी ः सर्पमित्र घडवणारी शेतकरी शिक्षण मंडळाची शाळा.
-----------------------------------------------------------
ढोलगरवाडीतील सर्प प्रदर्शनाला बंदी
अर्धशतकी परंपरा खंडीत ः राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे निकष न पाळल्याचा ठपका
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २१ ः ढोलगरवाडी (ता. चंदगड) येथील शेतकरी शिक्षण मंडळाच्या सर्पोद्यानाकडून राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नियम पाळले जात नसल्याचा ठपका ठेवला आहे. त्यामुळे यावर्षी नागपंचमीनिमित्त तेथील सर्प प्रदर्शनाला बंदी घातली आहे. नैसर्गिक साखळीत सापाचे अनन्यसाधारण महत्व आहे. हे वैज्ञानिक निकषावर समजावून सांगणाऱ्या आणि हजारो सर्पमित्र घडवणाऱ्या महाराष्ट्रातील एकमेव सर्पोद्यानाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष दिवंगत बाबूराव टक्केकर यांनी १९६६ मध्ये शाळेला जोडून सर्पोद्यानाची निर्मिती केली. अशा प्रकारची देशातील ही एकमेव शिक्षण संस्था ठरली. त्याचवर्षी त्यांनी नागपंचमीनिमित्त गावात सर्पप्रदर्शन भरवले. तेव्हापासून ५६ वर्ष ते अव्याहत सुरु राहिले. पुस्तकी ज्ञानाबरोबरच निसर्ग, पर्यावरण आणि सापाविषयी प्रत्यक्ष माहिती घेऊन शेकडो सर्पमित्र घडले. नोकरी, व्यवसाय सांभाळत ते सर्पमित्र म्हणून कार्यरतही झाले. या सर्पोद्यानाची ख्याती देश पातळीपर्यंत झाली. केंद्र शासनाच्या आणि खासगी कंपनीच्या आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक कर्मचाऱ्यांनी येथे सर्प हाताळणीचे प्रशिक्षण घेतले. शाळेसाठी ही अभिमानाची बाब ठरली.
राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाच्या नियमांमध्ये होत गेलेले बदल या संस्थेलाही लागू पडले. उत्कृष्ट कामाच्या जोरावर प्रशासनाकडून निकषांची पूर्तता करण्यासाठी मुदतवाढ मिळत राहिली. निकषही जाचक असल्याने संस्थेला ते पूर्ण करणे अवघड झाले. जिल्हाधिकाऱ्यांनी संस्थेसाठी हेरे (ता. चंदगड) हद्दीमध्ये पाच एकर जागा देण्याबाबत महसूल प्रशासनाला आदेश काढला. मात्र ही जागा वन हद्दीत येते. त्यांचे नियम पाळून ती ताब्यात घेण्यासाठी संस्थेची इच्छाशक्ती महत्वाची. मात्र त्याच दरम्यान संस्थेत सत्ताकारणाचा वाद सुरु झाला. त्यामुळे संस्थेच्या सर्पोद्यानाचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. ते संपल्यास नागपंचमी आणि ढोलगरवाडी येथील सर्प प्रदर्शन ही परंपरा कायमची खंडीत होण्याची भिती आहे.
-----------------
केवळ समाजसेवा हा उद्देश ठेवून पदरमोड करुन संस्थेने सर्पोद्यान सांभाळले. अनेक सर्पमित्र घडवले. मात्र यापुढील काळात अस्तित्व टिकवायचे झाल्यास राष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे नियम पाळणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत ते खूप अवघड आहे.
- सदाशिव पाटील, सर्पोद्यान प्रमुख, ढोलगरवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com