ग्रामीण भागात तयार खाद्यपदार्थांना मागणी

ग्रामीण भागात तयार खाद्यपदार्थांना मागणी

04098
खोराटवाडी : सांडगे घालताना एक कुटुंब.  ( छायाचित्र : श्रीकांत देसाई, आजरा )
----------------------
ग्रामीण भागात तयार खाद्यपदार्थांना मागणी
सांडगे, पापड, शेवया घरी करण्याऐवजी विकत आणण्यास प्राधान्य
सुनील कोंडुसकर : सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १० : विविध कारणांनी ग्रामीण भागातही तयार खाद्यपदार्थांना मागणी वाढली आहे. सांडगे, पापड, शेवया यासह विविध खाद्यपदार्थ घरात करण्याऐवजी थेट विकत आणले जात आहेत. त्यामुळे नवीन पिढी पारंपारिक हस्तकलांपासून दूर जात आहे. त्या टिकून रहाव्यात यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न गरजेचे आहेत.
एप्रिल, मे महिन्यात सांडगे, पापड, शेवया यासह विविध खाद्यपदार्थ तयार करून पावसाळ्यासाठी तजवीज केली जायची. कुटुंबातील आणि शेजारच्या व्यक्तींची मदत घेऊन हे पदार्थ घरातच तयार केले जायचे. सांडग्यासाठीचे पीठ मळणे, योग्य आकारात ते पुन्हा तोडणे ही एक प्रकारची कलाच असते. पापड लाटून ते उन्हात वाळवणे, त्याचप्रमाणे शेवयाही उन्हात वाळवून त्या पुन्हा डब्यात सुरक्षित भरून ठेवणे यासारखी कामे केली जायची. आपसूकच नवीन पिढीला हे पदार्थ तयार करण्याची पद्धती (रेसिपी) सहजगत्या अवगत व्हायची. नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात राहणारे नातेवाईक गावाकडूनच हे पदार्थ घेऊन जायचे. त्यांना गृहीत धरूनच गावाकडचे नातेवाईकही असे पदार्थ बनवायचे. मिरची पूडमध्ये योग्य प्रमाणात मसाले मिसळून पावसाळ्यासाठी वापरात आणायची हे काम घरातच केले जायचे. मात्र आता कुटुंबं विभक्त झाली. कुटुंबातील सदस्य संख्या कमी झाली, नोकरी - व्यवसायातून वेळ मिळत नाही यासह विविध कारणांनी थेट बाजारातून पदार्थ विकत आणण्याकडे कल वाढला आहे. स्थानिक पातळीवर महिला बचत गटांनीही हे पदार्थ पुरवण्याचे नियोजन राबवले आहे. परिणामी सहजपणे संस्कारित होणाऱ्या कुटुंबातील एका पारंपारिक कलेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
-------------
पावसाळ्यासाठी लागणारे खाद्यपदार्थ एकमेकांच्या मदतीने घरातच बनवले जायचे. त्यामुळे एक कला अवगत व्हायची. ते पदार्थ बनवण्यात आणि आपल्या माणसांना खायला देण्यात समाधान होते. मात्र आता तयार खाद्यपदार्थांमुळे ही कला लुप्त होते की काय अशी भीती आहे.
- दयावती गावडे, कानूर बुद्रूक, (ता. चंदगड)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com