मसाई पठारावरील लेणी परिसराचे सुशोभीकरण

मसाई पठारावरील लेणी परिसराचे सुशोभीकरण

00607
देवाळे : मसाई पठारावरील लेण्यांच्या परिसरात केलेले सुशोभीकरण.
00608
देवाळे : मसाई पठारावरून खाली उतरण्यासाठी केलेल्या पायऱ्या.

मसाई पठारावरील पर्यटनाला मिळणार चालना
सुशोभीकरणाच्या कामे अंतिम टप्यात; बारमाही झऱ्याचेही होणार संवर्धन
उत्तम महाडिक : सकाळ वृत्तसेवा
देवाळे, ता. १० : पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे टेबल लँड म्हणून प्रसिद्ध असणारे, पर्यटकांना बाराही महिने भुरळ घालणारे विस्तीर्ण निसर्गरम्य ठिकाण म्हणजे मसाई पठार. या पठाराच्या पश्‍चिमेला जागृत मसाई देवीच्या मंदिरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ‘पांडवदरा’ नावाच्या दरीत पुरातन लेण्या आहेत. या लेण्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित होत्या. आता पठारावरील या लेण्यांचे सुशोभीकरणाची कामे सुरू झाली असून ती अंतिम टप्प्यात आहेत. याच गुहांच्या समोरून वाहणाऱ्या बारमाही झऱ्याचेही संवर्धन होणार आहे. यामुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे.
या लेण्यांबाबत दैनिक ‘सकाळ’ने ‘पुरातन लेण्यांचे संवर्धन कधी?’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध करून त्यावर प्रकाशझोत टाकला होता. त्यामुळे परिसरातील अनेक नागरिकांच्या व जिल्ह्यातील इतिहास, निसर्गप्रेमींबरोबरच लोकप्रतिनिधींनी याबाबत मागणी करून पाठपुरावा केला होता. त्यामुळे शासन स्तरावर हालचाली होऊन वन विभागाच्या ताब्यात असणारा हा परिसर राज्य पुरातत्त्व खात्याकडे वर्ग करण्यात आला. राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभागाने या लेण्यांचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यास निधी उपलब्ध करून कामाला सुरुवात केली आहे. यामध्ये येथे असणाऱ्या गुहांमधील खांबांचे बांधकाम व मजबुतीकरण, समोरील बाजूस चौथऱ्यांचे बांधकाम, गुहांच्या वरील बाजूस संपूर्ण ग्रीलचे संरक्षण कुंपण तसेच दरीत उतरण्यासाठी सुशोभित अशा पायऱ्यांचे बांधकाम केले आहे. तसेच हा परिसर स्वच्छ केला आहे. त्यामुळे या परिसराचे सौंदर्य खुलून दिसू लागले आहे. याच गुहांच्या समोरून वाहणाऱ्या बारमाही झऱ्याचेही संवर्धन होणार आहे. या लेण्यांचे संवर्धन व सुशोभीकरण झाल्यामुळे मसाई पठारावर येणाऱ्या पर्यटकांबरोबरच परिसरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
------------------
चौकट
रोजगाराची संधी
जोतिबा, पन्हाळागड, पैजारवाडी मंदिर, जेऊर येथील शाहूकालीन चहाची बाग परिसरातील अँडव्हेंचर पार्क, मसाई पठार व पठारावरील मसाईदेवी मंदिर, यांच रांगेत येणारे बांदिवडे येथील अग्निस्तंभ ही ठिकाणे पर्यटकांना भुरळ घालत असतात. याबरोबरीने या पुरातन लेण्यांच्या विकास केल्यामुळे पर्यटन वाढीबरोरच येथे नवीन रोजगाराची संधी निर्माण होणार आहे.
----------------
चौकट
ओल्या पार्ट्यांवर हवी बंदी
येथील सौंदर्य जपण्याठी येथे असणाऱ्या गुहांमध्ये होणाऱ्या ओल्या पार्ट्या, जत्रा यावर बंदी घालण्याची गरज आहे. तरच, या परिसरात स्वच्छता राहणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com