
धामोड परिसरात बैलजोडींची संख्या घटली
धामोड परिसरात बैलजोड्या
घटल्याने मशागतीचा प्रश्न
धामोड, ता. १३ : येथील परिसरात शेतीच्या नांगरटीसाठी बैलांची संख्या कमी झाली आहे. परिसरात लम्पी स्कीन आजारामुळे शेतकऱ्यांना बैलजोडी सांभाळणे जिकिरीचे बनले आहे. त्यामुळे परिसरात शेतीकामासाठी बैलजोडी मिळणे मुश्कील झाले आहे. बैलजोड्याच कमी झाल्याने शेतीकामांसाठी आहे त्याच शेतकऱ्यांकडे औतासाठी मागणी वाढली आहे.
तालुक्याच्या पश्चिम तुळशी व धामणी परिसरात ऊस प्रमुख पीक आहे. येथे लम्पी आजाराने अनेक जनावरे दगावली आहेत. गाईसह बैलांनादेखील लम्पी रोगाची लागण होत असल्याने शेतकरीवर्ग धास्तावला आहे. येथे सात बैलजोड्यांना लम्पीची लागण झाली होती. यामध्ये चार बैल मृत झाले. त्यामुळे बैलजोडी सांभाळण्यासाठी शेतकरी धास्तावले आहेत. परिसरातील बहुतांशी शेती बैलांच्या सहाय्यानेच केली जाते. बैलांची संख्या कमी झाल्याने शेतीच्या मशागतीचा प्रश्न गंभीर बनला आहे. अत्यल्प असणाऱ्या बैलजोडींना शेतकरीवर्गातून मोठी मागणी आहे. बैलजोडी शेतीच्या कामासाठी मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे .
-----------
कोट :
लम्पी आजारामुळे बैलांची संख्या घटत आहे. त्यामुळे मशागतीचा प्रश्न गंभीर बनत आहे. परिसर डोंगराळ असल्याने यांत्रिकीकरणापेक्षा बैलांनाच शेतीकामासाठी पसंती दिली जाते.
- दत्तात्रय धनवडे, शेतकरी