
पुणे बंगळूर महामार्गावर उचगावजवळ मोटारीने दुचाकीस धडक दिली एकजण ठार एकजण जखमी
मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार
उचगावजवळ दुर्घटना : एकजण गंभीर जखमी
गांधीनगर, ता. १७ः पुणे - बंगळूर महामार्गावर उचगाव (ता. करवीर) येथील पेट्रोलपंपासमोर सकाळी ६ च्या सुमारास मोटारीने मोपेडला मागून धडक दिल्याने बाजीराव ज्ञानू पाटील (वय ४२, मूळ गाव तेलवे, ता. पन्हाळा, सध्या रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) हे जागीच ठार झाले. तर अभिजित गजानन बकरे (२८, रा. श्रीराम कॉलनी, उजळाईवाडी, ता. करवीर) हे गंभीर जखमी झाले. अपघातातील मोटारचालक मोटार सोडून पळून गेला.
याबाबतची अधिक माहिती अशी, सकाळी सहाच्या सुमारास बाजीराव पाटील आणि अभिजित बकरे हे मोपेडवरून मार्केट यार्डकडे जात होते. यावेळी पुणे - बंगळूर महामार्गावर उचगाव हद्दीतील पेट्रोल पंपासमोर ते आले असता मागून येणाऱ्या मोटारीने जोराची धडक दिली. या धडकेमध्ये बाजीराव पाटील हे डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाले, तर मोपेडवर मागे बसलेले अभिजित बकरे गंभीर जखमी झाले. बाजीराव पाटील हे मार्केट यार्डमध्ये एका खासगी दुकानात दिवाणजीचे काम करत होते. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली आहेत. जखमी अभिजित बकरे यांनी याबाबत पोलिसांत फिर्याद दिली असून अधिक तपास सहाय्यक फौजदार सुभाष सुदर्शनी करत आहेत.