संतोष ट्रॉफी फुटबॉल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संतोष ट्रॉफी फुटबॉल
संतोष ट्रॉफी फुटबॉल

संतोष ट्रॉफी फुटबॉल

sakal_logo
By

लोगो - संतोष ट्रॉफी
पश्चिम बंगालच प्रबळ दावेदार
ड गट फुटबॉल पात्रता फेरी कोल्हापुरात आजपासून
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : येथे शाहू स्टेडियमवर उद्यापासून (ता. ७) ७६ व्या संतोष ट्रॉफी राष्ट्रीय स्पर्धेतील ड गटाच्या पात्रता फेरीला प्रारंभ होत आहे. बलाढ्य पश्चिम बंगालच या गटातील प्रबळ दावेदार आहे. छत्तीसगढ, हरियाणा, मध्यप्रदेश, दमण आणि दीव यांचेही आव्हान आहे. परिणामी, महाराष्ट्राचे प्रशिक्षक स्टिव्हन डायस आणि खेळाडूंची घरच्या मैदानावर कसोटी लागणार आहे. खास करून मोठ्या संख्येने येणारे कोल्हापूरकर फुटबॉल शौकीन महाराष्ट्राला टॉनिक ठरतील का हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
स्पर्धेसाठी महाराष्ट्रसह ,​पश्चिम बंगाल​,​ मध्यप्रदेश​, छत्तीसगड​, ​दमन व ददरा​, हरियाणा​ असे सहा संघ दाखल झाले आहेत. स्पर्धेचे उद्‍घाटन दुपारी ​साडेतीन वाजता ​श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होणार आहे. ​यावेळी माजी खासदार संभाजीराजे, ​​के.एस.ए. अध्यक्ष मालोजीराजे, विफा महिला समिती अध्यक्ष​ ​मधुरिमाराजे यांची​ उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, स्पर्धेसाठी मैदान अद्यावत करण्यात आलेले​ आहे. स्पर्धा ठिकाणी प्रेक्षकांना मोफत प्रवेश आहे.
संतोष ट्रॉफी अव्वल राष्ट्रीय स्पर्धा मानली जाते. भारतीय फुटबॉल संघटनेचे तत्कालीन अध्यक्ष महाराजा मन्मतरॉय चौधरी यांनी सात दशकांपूर्वी स्पर्धेची संतोष या ठिकाणी (सध्या बांगलादेश) मुहूर्तमेढ केली. स्पर्धेवर पश्चिम बंगालचा दबदबा राहिला आहे. त्यांनी विक्रमी ३२ वेळा विजेतेपद, तर १४ वेळा उपविजेतेपद पटकावले आहे. पाठोपाठ पंजाब (आठ वेळा विजेता), केरळ (७), सर्व्हिसेस (६), गोवा (५) यांनी छाप पाडली आहे.
यंदाच्या स्पर्धेत एकूण ३५ राज्यांनी सहभाग घेतला आहे. या संघांची सहा गटांत विभागणी आहे. प्रत्येक गटातील विजेता मुख्य फेरीसाठी पात्र ठरणार आहे. गटातील तीन अव्वल दुसऱ्या क्रमांकाच्या संघांनाही मुख्य फेरीसाठी संधी आहे. रेल्वे आणि सर्व्हिसेसच्या संघांना मुख्य फेरीसाठी थेट प्रवेश आहे. यंदाच्या स्पर्धेचा अंतिम सामना दुबईत खेळवण्याचा निर्णय अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घेतला आहे. त्यामुळे दुबईला कोण पोहचणार, याची उत्सुकता आहे.
चार वेळेच्या माजी विजेत्या महाराष्ट्राला गतवर्षी नवख्या राजस्थानकडून झालेल्या पराभवामुळे पात्रता फेरीत गाशा गुंडाळावा लागला होता. यंदा पुण्यातील आंतरजिल्हा स्पर्धेतील उत्कृष्ट ४० खेळाडूंतून राज्य संघाची निवड झाली आहे. मुंबईचे दहा, पुणे आणि नागपूरचे प्रत्येकी तीन असे संघात फुटबॉलपटू आहेत. पहिल्यांदाच कोल्हापूरचे पाच खेळाडू घरच्या मैदानावर कशी कामगिरी करतात, याकडे लक्ष असेल. शेवटच्या बंगाल विरुद्ध महाराष्ट्र सामन्यातच गटाचा फैसला होईल, अशी अपेक्षा आहे.

गोवा, मेघालय, दिल्ली पात्र
अ गटातून दिल्लीने कर्नाटकाला नमवून आगेकूच केली. क गटातून आसाम आणि नागालॅंडचे आव्हान मोडून गोवा पात्र ठरला. ब गटात केरळ आणि मिझोराममध्ये जुगलबंदी सुरू आहे. ई गटातून मेघालयने बाजी मारली आहे. उर्वरित दोन गटांच्या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे.

आजचे सामने
सकाळी ८ : ३० - दमण व दादरा विरुद्ध छत्तीसगढ
सकाळी ११ : ३० - हरियाणा विरुद्ध पश्चिम बंगाल
दुपारी ३ : ३० ः महाराष्ट्र विरुद्ध मध्यप्रदेश