काळभैरीचे भाविक असुविधांच्या गर्तेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काळभैरीचे भाविक असुविधांच्या गर्तेत
काळभैरीचे भाविक असुविधांच्या गर्तेत

काळभैरीचे भाविक असुविधांच्या गर्तेत

sakal_logo
By

gad121.jpg
74961
गडहिंग्लज : पहिल्या छायाचित्रात जुन्या स्वच्छतागृहाच्या गायब झालेल्या पायऱ्या तर दुसऱ्या छायाचित्रात धोकादायक सभा मंडपाचा भाग. ( अमर डोमणे : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------
काळभैरीचे भाविक असुविधांच्या गर्तेत
सीमाभागाचे श्रद्धास्थान; डोंगरावर स्वच्छतागृहाची कमतरता, कठड्याची गरज
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १२ : सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील डोंगरावरील काळभैरीचे भाविक असुविधांच्या गर्तेत सापडले आहेत.
स्वच्छतागृहाची कमतरतेमुळे भाविकांची कुचंबणा होत आहे. डोंगर उतारावरील नव्या सभा मंडपाला संरक्षक कठडा नसल्याने दुर्घटनेचा धोका आहे. सांडपाणी निचरा होण्याची सोय नसल्याने दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे प्रशासन आणि मंदिर उपसमिती याकडे लक्ष देणार का? असा भाविकांचा सवाल आहे. येथून पाच किमीवर डोंगर कपारीत काळभैरीचे प्राचीन मंदिर आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमारेषेवर असणारे हे मंदिर सीमाभागातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दोन दशकांपूर्वी या मंदिराचा लोकवर्गणीतून जिर्णोध्दार झाला. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंतर्गत स्थानिक उपसमितीकडे या मंदिराचे नियंत्रण आहे. दरवर्षी फेब्रुवारीत काळभैरीची एकदिवसीय वार्षिक यात्रा भरते. रोजच शेकडो भाविक दर्शनासाठी येतात.
मंदिर परिसरात गैरसोयींचा डोंगर आहे. मंदिराला येण्यासाठी दोन मार्ग आहेत. झऱ्याचे भरपूर पाणी असूनही साठवणुकीची योग्य सोय नाही. पूर्वीच्याच दगडी टाकीत पाणी असते. मंदिरात येताना स्वच्छतेसाठी या पाण्याचा वापर होऊ शकतो. पण, त्यासाठी सोय नसल्याने उघड्यावरच भाविकांना थांबावे लागते. पाणी निचरा होण्यासाठी गटारीची सोय नसल्याने सभा मंडपाशेजारीच हे पाणी साठलेले आहे. परिणामी, दुर्गंधी पसरण्यास मदत होऊन डासांद्वारे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची सोय असली तरी ती कमी असून तो दर्शनी भागात नसल्याने भाविकांच्या लक्षात येत नाही.
मंदिर उपसमितीने लाखो रुपये खर्चून भव्य सभा मंडप साकारले आहे. पण, त्याच्याभोवती संरक्षक कठडे उभारलेले नाहीत. अशामुळे डोंगर उतारावरील मंडपात दुर्घटनेची शक्यता आहे. मंदिराच्या पायऱ्यांभोवती यात्रेतील विक्रेत्यांसाठी दोन दशकांपूर्वी दगडी चौक बांधले होते. ते चौक बांधकाम ठिसूळ झाल्याने भेगा पडून अनेक ठिकाणी दगड निसटल्याने धोकादायक बनले आहेत. देवाला प्रसाद बनवण्यासाठी भोजनगृह नसल्याने उघड्यावर जेवण शिजवल्याने भविकांमुळे परिसर अस्वच्छ बनत आहे. बड्याचीवाडी ग्रामपंचायत, उपसमितीने या असुविधा दूर कराव्यात अशी भाविकांची मागणी आहे.
----------------
असून अडचण.., नसून खोळंबा
काळभैरी डोंगर मंदिर परिसरात सध्या दोन स्वच्छतागृह आहेत. पूर्वीच्या स्वच्छतागृहाकडे पोहोचण्याच्या पायऱ्याच सभा मंडपाच्या बांधकामावेळी काढून टाकल्या. त्यामुळे तेथे पोहोचणे दिव्य झाले आहे. सभा मंडपालगतचे स्वच्छतागृह वनविभागाने बांधकामास स्थगिती दिल्याने कुलुपबंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे स्वच्छतागृहाची असून अडचण, नसून खोळंबा अशी अवस्था आहे.
----------
डोंगरावरील मंदिर परिसर उप समितीकडे आहे. बड्याचवाडी ग्रामपंचायतीत नव्या पदाधिकाऱ्यांची बैठक उद्या होणार आहे. यात्रेसाठी येणारे भाविक आणि विक्रेत्यांना अधिक सुविधा देण्यासाठी बैठकित नियोजन करणार आहे.
- बाजीराव खोत, सरपंच, बड्याचीवाडी