आय लिग फुटबॉल

आय लिग फुटबॉल

आयलिग फुटबॉलसाठी कोल्हापूरला आवतन
‘विफा’कडून विचारणा; शिवाजी मंडळ, दिलबहार, खंडोबाची होणार शिफारस

दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १० : यंदाच्या हंगामापासून अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) इंडियन फुटबॉल लिग (आय लिग) तृतीय श्रेणी स्पर्धा सुरू करण्याची घोषणा केली आहे. प्रत्येक राज्याचा लिग विजेता संघ यात सहभागी होईल. यासाठी वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) ने कोल्हापूर स्पोर्टस्‌ असोसिएशन (केएसए) ला संघांच्या शिफारशीसाठी विचारणा केली आहे. त्यानुसार केएसएने अव्वल तीन मानाकिंत संघाच्या शिफारशीचा निर्णय घेतला आहे. त्यात शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम आणि खंडोबा तालीम मंडळाचा समावेश आहे.
एआयएफएफच्या ‘व्हिजन ४७’ अंतर्गत भारतीय फुटबॉल देशातील सर्वच विभागांत पोहचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आय लीगमध्ये अधिकाधिक विभागातील संघांना सामावून घेण्याचे धोरण राबविले जात आहे. त्याचाच भाग म्हणून इंडियन सुपर लिग (आयएसएल), आय लीग संघ नसणाऱ्या राज्य आणि शहरांना प्राधान्य दिले जात आहे. दरवर्षी प्रथम आणि द्वितीय श्रेणी आय लिग स्पर्धा होते. यंदापासून अधिकाधिक विभागांना प्रवाहात आणण्यासाठी तृतीय श्रेणी स्पर्धा होणार आहे. राज्याचे लिग विजेते किंवा राज्य संघटनांनी शिफारस केलेल्या संघांना यात प्रवेश आहे. तृतीय श्रेणीतून अव्वल तीन संघांना द्वितीय श्रेणीत बढती मिळेल. राज्य संघटनांना ३० जुलैअखेर संघाचे नाव द्द्यायचे आहे.
यासाठी विफाने केएसएला संघाच्या शिफारशीसाठी पत्राने विचारणा केली आहे. केएसएने अव्वल मानाकिंत शिवाजी तरुण मंडळ, दिलबहार तालीम आणि खंडोबा तालीम मंडळ यांना एआयएफएफच्या निकषानुसार २५ जुलैपर्यंत पूर्तता करून निर्णय देण्यास कळविले आहे. आजअखेर केवळ मुंबई, पुण्याच्या संघांनाच प्रथम आणि व्दितीय श्रेणीत संधी मिळाली आहे. खुल्यासह वयोगटाच्या आंतरजिल्हा स्पर्धेत वरचष्मा राखणाऱ्या या केंद्राने दर्जाबाबत सर्वांनाच मागे टाकले आहे. परिणामी, तृतीय श्रेणीसाठी राज्यात कोल्हापूरचा हक्क निश्चित वाढला आहे. आता पात्र संघ आणि केएसएनेच यासाठी विफाकडे रेटा लावायला हवा.

चौकट..
सुवर्णसंधी पदार्पणाची...
तृतीय श्रेणी आय लिगच्या निमित्ताने कोल्हापुरी फुटबॉलला व्यावसायिक फुटबॉलचे द्वार खुले होणार आहे. शतकी परंपरा, हजारो शौकीन, लोकाश्रय आणि टँलेन्ट असणारे शेकडो खेळाडू अशा एकापेक्षा एक जमेच्या बाजू असणाऱ्या या केंद्राला प्रथमच राष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पणाची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. त्यासाठी फुटबॉलच्या सर्वच घटकांनी जोर लावायला हवा, अशीच माजी फुटबॉल खेळाडूंची मागणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com