धेंपोचे नऊ वर्षांनंतर आय लीगमध्ये पुनरागमन

धेंपोचे नऊ वर्षांनंतर आय लीगमध्ये पुनरागमन

फोटो क्रमांक : gad305.jpg

80744
दिल्ली : आय लीग द्वितीय श्रेणीचे उपविजेतेपद साकारल्यावर जल्लोष करताना धेंपो संघाचे खेळाडू.
................
धेंपोचे नऊ वर्षांनंतर आय लीगमध्ये पुनरागमन

द्वितीय श्रेणी फुटबॉलचे उपविजेतेपद : पुढीलवर्षी गोव्याचे दोन संघ; महाराष्ट्राची गच्छंती

दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३० : भारतीय फुटबॉलमधील यशस्वी संघ म्हणून नावलौकिक असणाऱ्या गोव्याच्या धेंपो स्पोर्टस् क्लबने नऊ वर्षांनंतर आय लीगमध्ये प्रथम श्रेणीत पुनरागमन केले. निर्णायक सामन्यात धेंपोने दिल्लीच्या सुदेवा एफसीला पिछाडीवरून येत ३-१ असे नमवून २७ गुणांसह द्वितीय श्रेणी आय लीगचे विजेतेपद साकारले. परिणामी, पुढील हंगामात गोव्याचे चर्चिल ब्रदर्स आणि धेंपो असे दोन संघ आय लीग खेळतील. ऑरेंज महाराष्ट्र एफसी आणि केंकरे एफसी या महाराष्ट्रातील संघांच्या सुमार कामगिरीमुळे तिसऱ्या श्रेणीत गच्छंती झाली.
यंदा आय लीग प्रवेशासाठी संघांना अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले. यंदा प्रथमच सुरू झालेल्या तृतीय श्रेणीत विभागीय लढतीतून मुख्य फेरीसाठी पात्रता सिद्ध करावी लागली. पाच गटांतून प्रत्येकी एक संघ मुख्य फेरीसाठी पात्र ठरला. ‘क’ गटातून धेंपोने १० गुणांसह आगेकूच केली. मुख्य फेरीतही गोव्याचा स्पोर्टिंग, धेंपो आणि बंगळूर स्पोर्टिंग या तीन संघांना प्रत्येकी सात समान गुणांमुळे द्वितीय श्रेणीत संधी मिळाली. खासकरून बंगळूर स्पोर्टिंगने युवा प्रशिक्षक चिंटा चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली विजेतेपद पटाकावत आय लीगमध्ये प्रथम श्रेणीचे सर्वप्रथम तिकीट काढले.
भारतीय संघाचा माजी कर्णधार समीर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली धेंपो ॲकॅडमीच्या युवा खेळाडूंचा भरणा असणाऱ्या संघाने शेवटच्या टप्प्यात जिगरबाज खेळ केला. विशेषतः पारंपरिक प्रतिस्पर्धी स्पोर्टिंगला नमवत आशा जिंवत ठेवल्या. निर्णायक सामन्यात धेंपोला बरोबरीचा एक, तर सुदेवाला तीन गुणांची आवश्यकता होती. पूर्वार्धात एक गोलने पिछाडीवर असणाऱ्या धेंपोने उत्तरार्धात जिद्दीने विजय खेचत सुदेवा एफसीच्या आय लीगमध्ये परतण्याच्या आकांक्षांना सुरुंग लावला. महाराष्ट्र ऑरेंज एफसी आणि कोलकात्याच्या युनायटेड एफसीचे प्रत्येकी १५ गुण समान असूनही गोल सरासरीवर ऑरेंज एफसी शेवटून दुसऱ्या स्थानावर, तर केंकरे शेवटच्या स्थानावर फेकला गेल्याने तृतीय श्रेणीत गच्छंती झाली. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी आय लीगला डावलून आयएसएल भारतीय फुटबॉलमध्ये अधिक बळ देत असल्याचा आरोप करत धेंपो, स्पोर्टिंग आणि चर्चिल या गोव्याच्या तीन संघांनी आय लीगमधून अंग काढून घेतले होते.
......
चौकट...
सर्वाधिक यशस्वी संघ
‘गोल्डन ईगल’ नावाने ओळखला जाणारा धेंपो संघ भारतीय फुटबॉलमधील सर्वात यशस्वी संघ मानला जातो. राष्ट्रीय फुटबॉल साखळीचे २००४-०५ आणि २००६-०७ मध्ये अजिंक्यपद मिळविले. आय लीग प्रथम श्रेणीचे २००७-०८, २००९-१०, २०११-१२ अशी पाच विजेतेपदे ज्येष्ठ प्रशिक्षक अरमांडो कुलासो यांच्या मार्गदर्शनाखाली मिळवली. ड्युरँड, सुपर कप, फेडरेशन यासह एएफसी आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहोचण्याची किमया साधली.
................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com