नवोदित फुटबॉलपटूंना मिळणार प्रोत्साहन

नवोदित फुटबॉलपटूंना मिळणार प्रोत्साहन

84051
चौदा वर्षांखालील फुटबॉल सामन्याचे संग्रहित छायाचित्र.
......
नवोदित फुटबॉलपटूंना मिळणार प्रोत्साहन

‘एआयएफएफ’चा निर्णय : स्पर्धेसाठी प्रत्येक राज्य संघटनेला देणार विशेष निधी

दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १६ : भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी नवोदित खेळाडूंच्या जडणघडणीवर भर देण्याचा निर्णय अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने घेतला आहे. पुढील हंगामापासून कुमार आणि कुमारी गटातील (१४ वर्षे) खेळाडूंसाठी प्रत्येक राज्य संघटनेने किमान चार कार्यक्रम राबवावेत. या गटासाठी एक स्पर्धा असावी. एआयएफएफ या उपक्रमासाठी खास निधी प्रत्येक राज्य संघटनेला देणार आहे. या निर्णयाने नवोदितांचा फुटबॉल अधिक धावू शकेल अशी आशा आहे.
भारतातील फुटबॉलचा दर्जा उंचावयाचा असेल तर कुमार आणि युवा खेळाडूंच्या विकासावर भर द्यावा, अशी सूचना जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) केली आहे. वयोगटातील खेळाडूंची निर्णयक्षमता विकसित करण्यासाठी हंगामात किमान ४० सामने खेळायला हवेत असे निर्देश आहेत; पण आपल्याकडे पूर्वीपासून केवळ वरिष्ठ गटाकडे अधिक लक्ष दिल्याने एकेकाळी आशियाई स्तरावर अव्वल असणारा आपला देश आज जागतिक क्रमावारीत १२१ व्या, तर आशियाईमध्ये २२ व्या स्थानावर फेकला गेला. त्यामुळेच खडबडून जाग आलेल्या ‘एआयएफएफ’ने कुमार आणि युवा खेळाडूंची विकासाकडे नजर वळवली आहे. त्याचाच भाग म्हणून यंदापासून स्वामी विवेकानंद ही २० वर्षांखालील नवी राष्ट्रीय स्पर्धा सुरू केली.
एआयएफच्या नव्या कार्यकारिणीने प्रथमच डेव्हलममेंट (विकास) समिती स्थापन केली आहे. नव्या आर्थिक वर्षात या समितीची बैठक झाली. यात नवोदितांच्या जडणघडणीवर चर्चा झाली. यात प्रत्येक राज्य संघटनेला नवोदितांच्या उपक्रमासाठी निधी देण्याची घोषणा केली. या गटासाठी पुरस्कर्ते नसल्याने नवोदित उपेक्षित आहेत. अनेक राज्यांत या वयोगटातील खेळाडूंची संख्या वाढली असली तरी बहतांशी राज्य, जिल्हा संघटनाही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने केवळ वरिष्ठ गटाची औपचारिकता दरवर्षी पूर्ण केली जाते. मात्र, आता नवोदितांच्या उपक्रमासाठी एआयएफएफने निधीची घोषणा केल्याने राज्य, जिल्हा संघटना पुढे सरसावतील अशी अपेक्षा आहे. याद्वारे फुटबॉल खेळणाऱ्या मुले आणि मुलींची संख्यात्मक वाढ होऊन त्यातून प्रतिभावंत शोधणे अधिक सोपे जाईल.
.....
चौकट...
विकासाला चालना
सध्या एआयएफएफतर्फे पंधरा, सतरा वर्षांखालील गटासाठी कनिष्ठ इंडियन लीग (आय लीग) घेतली जाते. पण, त्यात देशातील केवळ बंगाल, गोवा, केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात या मोजक्या राज्यांतील महानगरांतील अकादमी सहभागी होतात. त्यामुळे उर्वरित राज्यांतील खेळाडूंना संघाची आर्थिक कुवत नसल्याने संधीच नाही. या निर्णयामुळे प्रत्येक राज्य संघटनेला निधी मिळणार असल्याने नवोदितांसाठी प्रशिक्षण, स्पर्धा होतील. साहजिकच देशाच्या कानाकोपऱ्यांतील नवोदितांना प्रोत्साहन मिळून फुटबॉल विकासाला चालना मिळेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com