
सायकल शर्यतीत सलग ३६ व्या वर्षी शिंगटे विजेते
08085
घुणकी: येथील मंगोबा यात्रेनिमित्त आयोजित सायकल व सुटा घोडा शर्यतीतील क्षण. (छायाचित्र ः दिग्विजय मोहिते, घुणकी)
------
सायकल शर्यतीत सलग ३६ व्या वर्षी शिंगटे विजेते
घुणकीतील मंगोबा यात्रा; घोडा शर्यतीत सावर्डेचे हणमंत चव्हाण प्रथम
घुणकी, ता. २१ : येथील ग्रामदैवत मंगोबा यात्रेनिमित्त घेतलेल्या सायकल शर्यतीत शिराळ्याच्या प्रदीप शिंगटेने सलग ३६ व्या वर्षी प्रथम क्रमांक पटकावला. सुटा घोडा शर्यतीत सावर्डेच्या हणमंत चव्हाण यांच्या घोड्याने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्यांना देणगीदारांच्या हस्ते रोख रक्कम, शिल्ड, निशाण देऊन गौरवले.
मंगोबा दैवताची यात्रा दोन दिवस सुरू आहे. काल पहाटे देवतांची भाकणूक झाली. दिवसभर देवदर्शन, सासनकाठ्यांचे नृत्य, बालकांना उधळणे कार्यक्रम झाले. सायंकाळी ढोलांच्या गर्जनेत, भंडाऱ्याच्या उधळणीत ‘श्रीं’ची पालखी मिरवणूक निघाली. रात्री गावात कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्रा तुफान यांचा मनोरंजनाचा, तर मंदिरात रात्रभर ओव्यांचा कार्यक्रम झाला. आज सकाळी सायकल व सुटा घोडा शर्यती झाल्या. दिवसभर दर्शन, सासनकाठ्यांचे नृत्य, सायंकाळी ‘श्रीं’च्या पालखीची मिरवणूक निघाली.
सायकल शर्यतीचा निकाल असा ः अनुक्रमे तीन असे - प्रदीप विष्णू शिंगटे (पोलिस पाटील, जांबळवाडी ता. शिराळा), बाळू हिरेमठ (चंदूर), राम विष्णू जाधव (सांगलीवाडी). सिंगल घोडा - हणमंत चव्हाण (सावर्डे), सागर वायदंडे (गांधीनगर), छबी प्रेमी (शिये).