गारगोटी : केपी''नी ठोकला शड्डू

गारगोटी : केपी''नी ठोकला शड्डू

के. पी. पाटील यांनी ठोकला शड्डू
राधानगरी-भुदरगड विधानसभा : वाकिघोलला प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

धनाजी आरडे : सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. ६ : राधानगरी-भदुरगड विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार के. पी. पाटील यांनी निवडणूक लढविणारच म्हणून शड्डू ठोकला आहे. वाकिघोल येथे दैवत वाकोबाला साकडे घालून आणि तेथे प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन सर्वांच्या साक्षीने रणशिंग फुंकले आहे. त्यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना आव्हान दिले आहे.
लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्यातील राजकीय चित्र स्पष्ट होताच माजी आमदार के. पी. पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेऊन राजकीय मते आजमावत पुढील दिशा स्पष्ट केली. विधानसभा निवडणुकीला अजून वेळ आहे. याबाबतचे राज्यातील पक्षीय चित्र अद्याप स्पष्ट नाही. तरीही ''केपी हाच पक्ष, केपी हेच चिन्ह आणि केपी हाच झेंडा'' चा नारा त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
के. पी. पाटील यांनी यापूर्वी राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे दोनदा नेतृत्व केले. मात्र, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत आमदार आबिटकर यांनी त्यांना पराभूत केले. आपल्या कार्यकर्त्याने आपल्या विरोधात निवडणूक लढवून सलग दोनदा केलेला पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे. यामुळे आगामी निवडणुकीत त्याचा वचपा काढण्यासाठी ते पुन्हा रिंगणात उतरण्याची तयारी करीत आहेत. वर्षभरापूर्वी बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत मिळविलेल्या विजयानंतर त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. अडीच वर्षांपूर्वी राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथी, सत्ताबदल यात विद्यमान आमदार आबिटकर यांचा असलेला सहभाग, त्यांच्याबद्दल मतदारसंघात निर्माण झालेली नाराजी याचा फायदा उठवण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. त्यांनी राज्यातील पक्षीय आघाड्यांची व्यूहरचना कशी होईल, पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल का याचा विचार करीत आणि वाट बघत बसण्यापेक्षा पुढील राजकीय दिशा कशीही असो मी निवडणूक लढवणारच अशी ठाम भूमिका घेत मैदानात उतरणार असे जाहीर केले आहे.

चौकट
अन्य इच्छुकांच्या भूमिकेबाबत उत्सुकता
आजघडीला मतदारसंघात दोघांतील लढतीचे चित्र असले तरी बरेच इच्छुक आहेत. यामध्ये राधानगरीतून ए. वाय. पाटील, भुदरगडमधून राहुल देसाई यांच्यासह अनेक इच्छुकांची पुढील भूमिका काय राहणार याबाबत उत्सुकता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com