
वीज वितरणच्या अभियंत्यास मारहाण..
वीजपुरवठा खंडित केला म्हणून
अभियंत्याला बेदम मारहाण
हातकणंगले येथील घटना : एकावर गुन्हा दाखल
हातकणंगले, ता. २० : थकीत बिलापोटी वीजपुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून हातकणंगले येथील वीज वितरणचे कनिष्ठ अभियंता रोहित राजेंद्र बिरनाळे (वय ३४, रा. माणगाव, ता. हातकणंगले) यांना आज सायंकाळी त्यांच्या कार्यालयात जाऊन एकाने अर्वाच्च्य भाषेत शिविगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. विनोद राजेंद्र पाटील(रा. हातकणंगले) असे संशयिताचे नाव असून बिरनाळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्याच्यावर हातकणंगले पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, विनोद पाटील याचे आजोबा बाबू नारायण एडके यांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे त्यांचा विद्युतपुरवठा खंडित केला होता. याचा जाब विचारण्यासाठी विनोद सायंकाळी वीज वितरणच्या कार्यालयात गेला होता. त्याने कनिष्ठ अभियंता बिरनाळे यांच्याशी वाद घालत त्यांची कॉलर पकडून त्यांच्या तोंडावर बुक्क्यांनी मारहाण केली. त्यांचे कपडे फाडून अर्वाच्च्य भाषेत शिवीगाळ करत बघून घेण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार स्वतः बिरनाळे यांनी हातकणंगले पोलिसांत दिली आहे. रात्री त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून हातकणंगले पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.