
विषय समिती सभापती निवडी शुक्रवारी
विषय समिती सभापती निवडी शुक्रवारी
हातकणंगले नगरपंचायत; शिवसेना शिंदे गट-भाजप एकत्र येण्याची उत्सुकता
हातकणंगले, ता. १३ ः येथील नगरपंचायतीमधील विषय समिती सभापतींच्या निवडी शुक्रवारी (ता. १७) होणार आहेत. आजवर या समित्यांवर मविआअंतर्गत शिवसेनेचे वर्चस्व राहिले आहे; मात्र राज्यातील बदलत्या राजकीय घडामोडीनंतर यातील शिवसेनेच्या बहुतेक नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. सध्या राज्यात शिंदे गटाने भाजपशी हातमिळवणी करत सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे राज्यातील फॉर्म्युल्याप्रमाणे हातकणंगलेतही या निवडीदरम्यान शिंदे गट आणि भाजप एकत्र येणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. तसे झाल्यास भाजपलाही यातील काही पदे मिळण्याची शक्यता आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्या असून वरिष्ठ नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
हातकणंगले नगरपंचायत स्थापनेनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत शिवसेना सात, भाजप पाच, काँग्रेस व राष्ट्रवादी प्रत्येकी एक, तर तीन अपक्ष सदस्य निवडून आले. नगराध्यक्षपद काँग्रेसला मिळाले. राज्यातील त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार मविआने एकत्र येत सत्ता स्थापन केली. त्यामुळे उपनगराध्यक्षपदासह बहुतेक सभापती निवडीवर शिवसेनेचे वर्चस्व राहिले.
चार महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यातील घडामोडीनंतर याच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यात काँग्रेसचेही काही पदाधिकारी होते. आता राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार असताना हातकणंगलेतील चित्र मात्र वेगळेच आहे. शिंदे गटाचे नगरसेवक भाजपच्या नगरसेवकांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप भाजपकडून सुरू आहे. तशा तक्रारीही संबंधितांनी वरिष्ठांपर्यंत केल्या आहेत. नुकताच निधी वाटपादरम्यानही यावरून वाद झाला. त्यामुळे शिंदे गटातील नगरसेवकांच्या सोयीस्कर भूमिकेवर भाजपच्या नगरसेवकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
पाणीपुरवठा, बांधकाम, महिला व बालकल्याण आणि आरोग्य सभापतींच्या निवडी शुक्रवारी होणार आहेत. त्यावेळी शिंदे गट आणि भाजप एकत्र येणार का? हा महत्त्वाचा प्रश्न असून त्यासाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. वरिष्ठ नेत्यांकडून यासाठी हालचाली सुरू असल्याने त्यांच्या भूमिका निर्णायक ठरणार आहेत.
--------------
राज्यात एक आणि गावात एक असे अजिबात चालणार नाही. राज्यातील फॉर्म्युल्याप्रमाणेच येथेही शिंदे गट व भाजपला समान न्याय मिळाला पाहिजे. मी सध्या अधिवेशनासाठी दिल्लीत आहे. दोन दिवसांत आल्यानंतर सर्वांशी चर्चा करून योग्य तो सकारात्मक मार्ग काढला जाईल.
-धनंजय महाडिक, खासदार.
भाजपच्या जिल्हाध्यक्षांसोबत चर्चा करून जागा वाटपाचा जो काही फॉर्म्युला ठरेल त्यानुसार राज्यातील शासनाच्या धर्तीवर हातकणंगलेचाही निर्णय घेऊ.
रवींद्र माने, जिल्हाध्यक्ष, बाळासाहेबांची शिवसेना.