
पाण्याअभावी झाडे लागली कोमेजू
02150
हुपरी : वैकुंठभूमी परिसरातील झाडांच्या वाढीवर पाण्याअभावी परिणाम होत आहे.
------------
पाण्याअभावी झाडे लागली कोमेजू
हुपरी वैकुंठभूमी; महिनाभरापासून अचानक पुरवठा बंद
हुपरी, ता. ७ : येथील वैकुंठभूमी परिसरातील झाडांना होणारा पाणीपुरवठा काही दिवसांपासून बंद झाला आहे. परिणामी, पाण्याअभावी झाडांची वाढ खुंटली असून झाडे कोमेजली जात आहेत. त्यामुळे झाडांना पूर्ववत पाणीपुरवठा करण्याची मागणी होत आहे.
शहरात वीर सेवा दल, रोटरी क्लब आदी सामाजिक तसेच स्वयंसेवी संस्थांनी उद्दात्त हेतूने वृक्षारोपणाद्वारे झाडांचे संगोपन व संवर्धन करून ‘हरित हुपरी, सुंदर हुपरी’ करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हुपरीच्या पर्यावरण आणि सौंदर्यात भर पडली आहे. यामध्ये पाणीपुरवठा माध्यमातून पालिकेचेही योगदान राहिले आहे.
मात्र, महिनाभरापासून येथील वैकुंठभूमी भागातील झाडांना होणारा पाणीपुरवठा अचानकपणे बंद केला आहे. येथे पर्यावरणदृष्ट्या उपयुक्त व शोभिवंत अशी विपुल झाडे आहेत. त्यांच्या वाढीवर पाण्याअभावी परिणाम होत आहे.
----------------------
वीर सेवा दल शहर शाखेतर्फे सामजिक भावनेतून हुपरीमध्ये तीन वर्षांत तीन हजारांवर झाडे लावून ती वाढवण्याचे काम केले आहे. यामध्ये देशी आणि विविध शोभिवंत अशा पर्यावरणदृष्ट्या उपयुक्त झाडांचा समावेश आहे. झाडांची पूर्ण वाढ होण्यासाठी पाणी मिळणे आवश्यक आहे.
- बंडोपंत फिरगाण, माजी संघ नायक, वीर सेवा दल हुपरी
------------------
शहरात एकीकडे मुख्य पाईप लाईनवरून बेकायदेशीररीत्या नळ कनेक्शन घेण्याचे सुरू आहेत. अशा स्थितीत झाडांचा पाणीपुरवठा बंद करण्याचा प्रकार अनाकलनीय आहे. पर्यावरणीय उपक्रमांत सामाजिक संस्था सर्वांगाने सहभाग दर्शवत असताना प्रशासनाने सहकार्य करणे अपेक्षित आहे. पाणीपुरवठा पूर्ववत चालू करावा.
- संजकुमार गाट, माजी नगसेवक
------------------------
गळतीमुळे पाइपलाईन बदलावी लागली. दुसऱ्या लाईनवरून व्हॉल्व्ह टाकून तेथे पाणीपुरवठा केला जात आहे. अधिक माहिती घेत असून झाडांना नियमित पाणीपुरवठा होण्यासाठी प्रयत्नशील आहे.
-प्रसाद पाटील, पालिका आरोग्य व जल अभियंता