
पट्टणकोडोलीत भामट्याने लंपास केला किमती मोबाईल
बोलायला म्हणून मोबाईल
घेतला, अन् धूम ठोकली
पट्टणकोडोली येथील प्रकार
हुपरी, ता.२२: ‘मुलगी दवाखान्यात आहे, तिला अर्जंट फोन लावायचा आहे. प्लीज मोबाईल देता का ?’ असे म्हणून समोरच्याकडून मोबाईल घेऊन त्यावर बोलत असल्याचे नाटक करत एका भामट्याने सुमारे दहा हजार रुपये किमतीच्या मोबाईलसह दुचाकीवरून धूम ठोकली. हा प्रकार पट्टणकोडोली गावात मुख्य रस्त्यावर मंगळवारी (ता.२१) रात्री दहाच्या सुमारास घडला.
आळते येथील निशिकांत कांबळे हे एमआयडीसीमधील काम आटोपून आपल्या दुचाकीवरून घरी निघाले होते. त्यावेळी पट्टणकोडोली ते अलाटवाडी गणेश मंदिर मार्गावर ओढ्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी दुचाकीवरील भामट्याने त्यांना थांबवून ‘मुलगीला बरे नाही. दवाखान्यात ॲडमिट आहे. तिच्याशी तातडीचे बोलायचे आहे’ असे सांगून मोबाईल देण्याची विनंती केली. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून कांबळे यांनी खिशातील मोबाईल काढून दिला. त्यावेळी कांबळे बेसावध असल्याची संधी साधत भामट्याने दुचाकीवरून मोबाईलसह पट्टणकोडोलीच्या दिशेने धूम ठोकली. त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, पण तो निष्फळ ठरला. भामट्याने हेल्मेट परिधान केले होते. या प्रकरणी हुपरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.