वाहनांना दंड; वसुलीचे काय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनांना दंड; वसुलीचे काय
वाहनांना दंड; वसुलीचे काय

वाहनांना दंड; वसुलीचे काय

sakal_logo
By

05303, 05304
फोटो- संग्रहित

वाहनधारकांकडे सव्वादोन कोटींची उधारी

ई-चलान प्रणाली ः दंड झाला, पण वसुलीचं त्रांगडं कायम

ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी, ता. ४ : वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करून दंड वसुलीसाठी अद्ययावत ई-चलान पद्धत सुरू आहे; मात्र वाहनचालक दंडाची रक्कम भरत नाहीत. गेल्या वर्षभरात शहरात केलेल्या कारवाईतील तब्बल ९२ टक्के दंड वाहनचालकांनी भरलेलाच नाही, असा हा सुमारे २ कोटी ३१ लाख रुपयाहून अधिक दंड भरण्याकडे वाहनचालकांनी पाठ फिरवल्याने अनपेड डोंगराची उंची वाढतच आहे. नव्या वर्षात ही रक्कम वसूल करण्याचे मोठे आव्हान आता वाहतूक पोलिसांसमोर आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांविरोधात गेल्या तीन वर्षांपासून ई चलान प्रणालीद्वारे दंडाची आकारणी केली जात आहे. नियम मोडणाऱ्या वाहनाच्या क्रमांकाचे छायाचित्र वाहतूक पोलिस काढून तो प्रणालीत टाकतात आणि त्याआधारे संबंधित वाहनचालकाला दंडाच्या रकमेचा ‘एसएमएस’ नोंदणीक्रम मोबाईलवर जातो. संबंधित वाहनचालकाला त्या दंडाची रक्कम ऑनलाइन किंवा वाहतूक पोलिसांकडील यंत्राद्वारे भरता येते. २०२२ मध्ये १६ लाख ५५ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल झाला, मात्र वाहनचालक त्यांच्या दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात. याच चालकाने पुन्हा कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्यावर पुन्हा दुप्पट दराने दंड आकारणी होते.

-------
कारवाई कमी; दंड सर्वाधिक
सीसीटीव्ही व ई चलनमुळे कारवाई प्रत्येक वर्षी वाढतच आहे. गेल्यावर्षी कारवाईचे प्रमाण तिप्पटीने वाढले. यंदा कारवाईत घट झाली, मात्र दंडाची रक्कम वाहतूक शाखेच्या इतिहासात सर्वाधिक आहे. एक कोटींवरून तब्बल अडीच कोटींचा पल्ला दंडाने गाठला.
----
लोकअदालतचा धसका
अनपेड वाहनधारकांना वाहतूक शाखा नोटीस देते. भीतीने वाहनधारक न्यायालयाची पायरी चढतात. लोकअदालत आले की अनपेड दंडाचा डोंगर काहीसा कमी झाल्यासारखा वाटतो, मात्र पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणत दंड भरण्याकडे वाहनधारक पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे.
-----
सिग्नल तोडण्यासाठीच...
गतवर्षी बंद पडलेल्या सिग्नलसह शहरात पाच ठिकाणी वाहतूक शाखेने सिग्नल सुरू केले. या सिग्नलमुळे शहरात वाहतुकीला शिस्त कमी दंडात्मक कारवाईच अधिक झाली. एकूण कारवाईच्या ३० टक्के सिग्नल तोडल्याच्या कारवाई आहेत. त्यामुळे शहरातील सिग्नल यंत्रणा वाहनधारकांना तोडण्यासाठीच आहे का, अशी स्थिती निर्माण झाली.
-----
२०२२ मधील दंडात्मक कारवाई
तपशील ः कारवाई - दंड
बंद मार्गातून प्रवेश ः २१३४- १०६७०००
सिग्नल तोडणे ः ८३४०- ४१७००००
बेशिस्त वाहन पार्किंग ः ३४८१ - १७४००००
सीट बेल्ट न लावणे ः ४०७५ - ८१५००
ट्रीपल सीट ः २८६९ - १४३४५००
मोबाईल वापर ः ३३२४- १६६२०००
/भरधाव व चुकीच्या दिशेने
वाहन चालवणे
-----
कोट
वाहनधारकांनी आपले मोबाईल नंबर वाहनक्रमांकाशी अपडेट केलेले नाहीत. त्यामुळे अनेक वाहनांच्या जुन्या मालकांच्या मोबाईलवर कारवाईचा मेसेज जात आहे. त्यामुळे वाहनधारकांनी दंड भरण्याकडे पाठ फिरवत आहेत. वाहनधारकांनी वाहनावरील अनपेड दंड वाहतूक शाखेशी संपर्क साधून भरावा. विकास अडसूळ, सहायक पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा