मॉडीफाय दुचाकींना आवरणार कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉडीफाय दुचाकींना आवरणार कोण?
मॉडीफाय दुचाकींना आवरणार कोण?

मॉडीफाय दुचाकींना आवरणार कोण?

sakal_logo
By

05475,05476
संग्रहित

मॉडीफाय दुचाकींना आवरणार कोण?
धोक्याची घंटा; इचलकरंजीतील प्रमुख रस्त्यांवर भरधाव गाड्या पळवण्याच्‍या प्रकारांत वाढ
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २४ : शहरात मुलांचे मॉडीफाय दुचाकी चालवण्याचे प्रमाण वाढले आहे. भर बाजारपेठेतून धूमस्टाईलने ही मुले गाडी पळवत असल्याने अपघात घडण्याची शक्यता आहे. प्रमुख रस्त्यांवर मुले सुसाट वेगाने दुचाकी चालवताना पहायला मिळत आहेत. मूळ वाहनात अनेक बदल करून तयार केलेल्या दुचाकी धोक्याची घंटा आहे.
शहरांत युवकांकडून भरधाव मोटारसायकल पळवण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे बाजारपेठेत जाणाऱ्या महिला व पादचारी नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कोल्हापूर रोड, डेक्कन रोड, मुख्य मार्ग, स्टेशन रोड, मुख्य बसस्थानक, सांगली रोड आदी मार्गावर युवकांकडून भरधाव मोटारसायकल चालवण्यामुळे भीती निर्माण झाली आहे. गर्दीमधून ट्रीपल सीट व डब्बल सीट भरधाव मोटारसायकल चालवताना युवकांकडून महिला व नागरिकांना कट मारण्याचा प्रकारही अवलंबला जात आहे. याचा कोणी जाब विचारल्यास अरेरावी करून शिवीगाळ करून दमदाटी केले जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत.
पोलिस प्रशासनाकडून शहरांमधून भरधावपणे मोटारसायकल चालवणाऱ्या युवकांबाबत कुठलीही भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे बाईक रायडर युवकांमध्ये पोलिस प्रशासनाच्या कारवाईबाबत भीती शिल्लक राहिली नसल्याचे चित्र आहे. चोरीच्या काही दुचाकी ‘मॉडीफाय’ करून वापरात आणल्या जात आहेत. हे कारवाईतून उघड होत आहे. ‘मॉडीफाय’ केलेल्या दुचाकी नव्‍याकोऱ्या दिसत असल्यामुळे त्याची तपासणीही होत नाही. दुचाकी चोरीचे प्रमाण काही महिन्यांपासून वाढले आहे. या अनुषंगानेही भरधाव मॉडीफाय दुचाकींवर पोलिसांनी कारवाईचा ड्राईव्ह राबवण्याची गरज आहे.
-----
कोबिंग ऑपरेशन थंड
चोरीच्या दुचाकींचा नेमका प्रवास कोणत्या दिशेने जातो हे पोलिसांसमोर आव्हानच आहे. सध्या बाईक चोरीची धूम सुरू आहे. चोरीच्या दुचाकींचा मार्ग ‘मॉडीफाय’ करण्याकडे जात आहे. दुचाकीच्या नंबरप्लेट, इंजिन नंबर, चेसीस नंबरची तपासणी केल्यास गुन्हे उघडकीस येतात. यासाठी सुरू केलेले जिल्हा पोलिस अधिक्षकांनी सुरू केलेले कोबिंग ऑपरेशन शहरात थंड आहे.
---
रात्री रंगतो थरार
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या नावाखाली दररोज लाखोंचा दंड वाहनचालकांकडून शहर वाहतूक पोलिस वसूल करतात. मात्र रात्री मॉडीफाय दुचाकीस्वार धूमस्टाईलने भरधाव वेगात अन् बूम... बूम... कर्णकर्कश आवाजात सुसाट बाईक राईडस् करत आहेत. अशा गटागटाने धावणाऱ्या या बाईकमुळे पादचारी, वाहनचालक त्रस्त आहेत.
---
दुचाकीच्या चोऱ्या वाढल्याने पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांना नाकाबंदी करून वाहने तपासण्याच्या सूचना दिल्या आहेत. यातून चोरट्या गाड्या उजेडात येतील. वाहतूक शाखेला मॉडीफाय दुचाकीबाबत सूचना देवून शहरात कारवाई केली जाईल.
-रामेश्वर वैंजणे, प्रभारी पोलिस उपाधीक्षक, इचलकरंजी