
घरफोडी
चोरट्यांनी पळविला ७३ हजारांचा मुद्देमाल
तारदाळला बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे फोडले घर
इचलकरंजी, ता. १६ : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील लग्नासाठी बाहेरगावी गेलेल्या कुटुंबाचे घर फोडून चोरट्याने ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पळविला. घरातील लाकडी व लोखंडी कपाट उचकटून लॉकरमध्ये ठेवलेले एक तोळे सोन्याचे दागिने, ५५ भाराच्या चांदीच्या साहित्यासह रोख १० हजार रुपये चोरीला गेले. या घटनेची शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून, याबाबत विशाल आनंद गुरव (वय २९) यांनी फिर्याद दिली आहे.
विशाल गुरव यांचा लहान भाऊ विकास याचे लग्नकार्य असल्याने सहकुटुंब बेळगाव येथे गेले होते. १३ फेब्रुवारीपासून घरातील सर्वजण बाहेरगावी असल्याचा फायदा घेत चोरट्याने त्यांचे घर फोडले. दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. लाकडी व लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून लॉकरमध्ये ठेवलेल्या मुद्देमालावर डल्ला मारला. त्यातील तीन ग्रॅम सोन्याची अंगठी, पाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे, दोन ग्रॅम वजनाचे लहान लॉकेट, ५५ ग्रॅम भार वजनाचे चांदीचे दागिने, समई यासह रोख दहा हजार रुपये, असा एकूण ७३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला. लग्न समारंभ आटोपून घरी परतताच घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. विशाल गुरव यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे.