
बसस्थानकातील सीसीटीव्ही कुचकामी
सीसीटीव्ही संग्रहित
-----------------
बसस्थानकातील सीसीटीव्ही कुचकामी
प्रवाशी असुरक्षित; इचलकरंजीत पोलिसांकडून एस टी प्रशासनाला सूचना
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.२२ : येथील मध्यवर्ती बसस्थानक प्रवाशांसाठी असुरक्षित बनत आहे. सीसीटीव्ही यंत्रणेची दिशा चुकल्याने बसस्थानक गुन्हेगारीच्या विळख्यात सापडत आहे. भरदिवसा महिला, वृद्धांना लुटले जात आहे. सीसीटीव्हीच्या दिशाहीन स्थितीबाबत पोलिसांनी एसटी आगार प्रशासनाला सूचना दिल्या आहेत. मात्र तरीदेखील सीसीटिव्ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे.
येथील बसस्थानकात प्रवाशांची वर्दळ असते. परजिल्ह्यासह लांब पल्ल्याच्या आणि स्थानिक मार्गावर बसफेऱ्या दिवसरात्र धावत असतात. व्यापार, नोकरी आणि शिक्षणासाठी मोठ्या संख्येने प्रवाशी या बसस्थकानात येत असतात. अनुचित प्रकार, चोऱ्या रोखण्यासाठी स्थानकात सहा सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. अलीकडे या कॅमेऱ्यांची स्थिती चिंताजनक आहे. चोरटे सहजपणे गर्दीत प्रवाशांना लुटत आहेत. याप्रकरणी तपासात पोलिसांना सीसीटिव्ही बिनकामाचा ठरत आहे. याबाबत पोलिसांनी वेळोवेळी एसटी आगार प्रशासनाला सूचना केल्या आहेत. तरीही सीसीटिव्हीची स्थिती जैसे थे आहे. चोरीच्या घटना काही थांबलेल्या नाहीत. परिणामी चोरट्यांचे धाडस वाढत आहेत.
सध्या बसस्थानकात सहा सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. यातील काही कॅमेऱ्याची दिशा चुकीच्या पद्धतीने आहे. प्रवाशांची वर्दळ सोडून सर्व काही कॅमेऱ्यात कैद होत आहे. हाच फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या गर्दीत हात साफ करत आहेत. बस फलाटावर लागल्यानंतर बहुदा गर्दी अधिक होते. मात्र ही बाजू सोडून सीसीटीव्हीचे कॅमेरे भलत्याच बाजूने वळवल्याचे चित्र आहे. त्यात फलाटावर एकाच वेळी दोनपेक्षा अधिक बस लागल्यास चोरट्यांना जास्तच फावत आहे. एसटी प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन प्रवाशांची सुरक्षितता जपणे गरजेचे आहे. तरच चोऱ्यांवर नियंत्रण येऊन तपासला गती येवू शकते.
----------
पोलिस कर्मचारी हवाच
दीड महिन्यांपूर्वी एका युवतीची छेडछाड झाल्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी बसस्थानकात पोलिस कर्मचारी नेमण्याची आश्वासन दिले होते. मात्र आश्वासन केवळ आश्वासनच राहिले. त्यानंतर चोरीच्या घटना घडल्या. चोऱ्या रोखण्यासाठी बसस्थानकात सीसीटीव्ही यंत्रणा जितकी महत्वाची तितकेच पोलिस कर्मचारी नियुक्त करण्याची गरज आहे. त्यामुळे बसस्थानकात दिवसभर अथवा गर्दीचा वेळी पोलिस कर्मचारी आवश्यक आहे.
-------
आगार व्यवस्थापनाकडून कमिटी नेमणूक बसस्थानकात सीसीटीव्ही बसवण्यात आली आहे. त्यामुळे सीसीटीव्हीची जागा योग्य नसल्यास पोलिसांच्या सूचनेनुसार बदल केला जाईल.
-संतोष बोगरे, वरिष्ठ आगार व्यवस्थापक