
चोरीच्या दुचाकींनी गहाणवटदार अडचणीत
फोटो - संग्रहित
चोरीच्या दुचाकींनी गहाणवटदार अडचणीत
पोलिसांचा ससेमिरा; जुनी वाहने घेताना खबरदारी घेण्याची आवश्यकता
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २४ : पोलिसांकडून दुचाकी चोऱ्या उघडकीस येत असल्याने वाहनधारकांच्या चिंतेने काहीसा आराम घेतला आहे; मात्र शहरातील गहाणवटदार अडचणीत आले आहेत. पाच-सहा हजारांमध्ये गाडी काही काळासाठी गहाणवट ठेवण्याच्या पद्धतीने चोरटे चोरी करत आहेत. त्यामुळे आता चोरीचे वाहन गहाणवट घेतलेल्यांचे पैसेही गेले आणि पोलिसांचा ससेमिरा लागला आहे. आता गहाणवटदारांची झालेली दशा पाहता यापुढे जुनी वाहने खरेदी करताना खबरदारी घ्यावी लागणार आहे.
शहरात दुचाकी चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गेल्यावर्षी शहरात दुचाकी चोरीचे तब्बल २६ टक्क्यांनी प्रमाण वाढले. त्यामुळे दुचाकी सुरक्षेची खबरदारी घेत चोरीचे प्रकार रोखण्यासाठी शहरातील पोलिस ठाण्यांनी कंबर कसली. नव्या वर्षात अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस येत असताना दोन दिवसांपूर्वी शिवाजीनगर पोलिसांनी येथील तीन आंतरराज्य दुचाकी चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून तब्बल २५ दुचाकी जप्त केल्या. चोरीच्या खोलात जाऊन पोलिसांनी तपास केला. चोरट्यांच्या चोरीच्या नवीन शक्कल समोर आल्या. गहाणवट ठेवण्याच्या पद्धतीनुसार चोरीची वाहने विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे पोलिस यंत्रणा चक्रावली असून गहाणवटदार लक्ष्य झाले आहेत.
इचलकरंजी शहरात वाहने काही काळासाठी गहाणवट ठेवून पैसे घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. हीच संधी शोधत चोरटे चोरीची वाहने गहाणवटीत मुरवत आहेत. गहाणवटदारही कमी पैशात वाहने मिळत असल्याने वाहन परत देण्याच्या भानगडीत पडत नाहीत. चोरीची वाहने सहज विक्री होत असल्याने चोरटेही निर्धास्त राहत आहेत. चोरट्यांची ही शक्कल उजेडात आल्यानंतर पोलिस यंत्रणा झपाटून कामाला लागली आहे. शिवाजीनगर पोलिसांनी जप्त केलेली सर्वाधिक वाहने इचलकरंजी परिसरातील आहेत. त्यामुळे गहाणवटदारही आता गुन्ह्यात अडकणार आहेत. यापुढे जुनी वाहने घेताना नागरिकांना सावधानता बाळगण्याची गरज आहे.
------------
बनावट कागदपत्रांवर नजर
कमी किमतीत जुन्या दुचाकींची विक्री करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे कारवाईतून समोर आले आहे. अनेकदा बनावट कागदपत्रे तयार करून चोरीच्या दुचाकींची विक्री केली जात आहे. अशावेळी बनावट कागदपत्रे तयार केल्यास चोरीची दुचाकी सहज विक्री होत आहे. त्यामुळे शहरात फिरणाऱ्या वाहनधारकांच्या बनावट कागदपत्रांवर पोलिसांची नजर असायला हवी.
-------
चोरीच्या दुचाकी ज्यांनी गहाणवट म्हणून घेतल्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात आहे. नागरिकांनी जुने वाहन अचूक कागदपत्रांशिवाय अजिबात खरेदी करू नये. वेळीच सावधान झाल्यास होणारी कारवाई टळेल.
-रामेवश्वर वेंजणे, प्रभारी पोलिस उपअधीक्षक, इचलकरंजी.