
समारोपाला सकस एकांकिका सादर
05720
इचलकरंजी : मराठी दिन महोत्सवाच्या समारोपदिनी ‘चफी’ ही एकांकिका विवेकानंद कॉलेज कोल्हापूर संघाने सादर केली.
समारोपाला सकस एकांकिका सादर
मराठी दिन महोत्सव; रसिकांचा प्रतिसाद
इचलकरंजी, ता. १ : चार दिवसीय मराठी दिन महोत्सवाचा समारोप ‘लेखकाचा कुत्रा’ आणि ‘चफी’ या दोन एकांकिका सादर करून झाला. लेखन, आशय व सादरीकरणाच्या दृष्टीने सकस असलेल्या दोन्ही एकांकिकांना रसिकांचाही चांगला प्रतिसाद लाभला. येथील मनोरंजन मंडळ, श्री दगडूलाल मर्दा फाउंडेशन, रोटरी क्लब सेंट्रल आणि अ. भा. मराठी नाट्य परिषद, इचलकरंजी शाखेतर्फे हा महोत्सव पार पडला.
मनोरंजन मंडळाचे माजी अध्यक्ष प्रताप होगाडे आणि नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. एस. पी. मर्दा यांच्या हस्ते नटराज व कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मर्दा फाउंडेशनचे विश्वस्त शामसुंदर मर्दा, रोटरी सेंट्रलचे सेक्रेटरी श्रीकांत राठी, मनोरंजन मंडळाचे अध्यक्ष समीर गोवंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
एकांकिका सादरीकरणाच्या पहिल्या सत्रात मिलाप थिएटर, पुणे प्रस्तुत आणि विशाल कदम लिखित, प्रणव जोशी दिग्दर्शित ‘लेखकाचा कुत्रा’ ही एकांकिका सादर करण्यात आली. प्रणव जोशी आणि नीलेश माने या दोन्ही कलाकारांच्या सशक्त अभिनयाने पाऊण तास रसिकांना खिळवून ठेवले. सुरुवातीला चांगली नाटके व एकांकिका लिहिणारा, पण दैनंदिन मालिका लिहिण्याच्या आणि त्यामुळे मिळालेल्या लोकप्रियतेच्या चक्रात अडकलेला लेखक आणि त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी आलेला एक उमेदीचा, युवा लेखक यांच्या संघर्षमय संवादातून ही एकांकिका उलगडत गेली. प्रस्थापित लेखकातील सकसपणा जाऊन त्याचा एकाच छापातील ‘कुत्रा’ बनू लागतो; पण नवीन लेखकाशी झालेला संवाद आणि त्याच्या निखळ, निर्मळ भावनांमुळे मालिकेच्या लेखनात अडकलेला लेखक भानावर येतो, असा आशय यात होता.
दुसऱ्या सत्रात विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर प्रस्तुत आणि मॅजिक कॅफे, कोल्हापूर निर्मित विनोदाची फोडणी दिलेली आशयपूर्णही असलेली ‘चफी’ ही एकांकिका सादर झाली. लेखन सुदर्शन खोत यांचे होते, तर शंतनू पाटील यांनी ती दिग्दर्शित केली होती. यश शिंदे, ऋतिका साळोखे, प्रतीक्षा गवस, निहाल रुकडीकर व प्रज्ञा कुलकर्णी यांच्या भूमिका होत्या. समाजातील ट्रान्सजेंडरवर आधारित ही एकांकिका परिणामकारक ठरली. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील कॉलेजवयीन मुलाच्या मनात मुलगी असल्याचा भावना असतात. त्यामुळे त्या कुटुंबाला मोठा धक्का बसतो; पण शेवटी मुलाच्या प्रेमापोटी ही समस्या मान्य करून त्याची लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यासाठी आई-वडील तयार होतात, हा प्रवास या एकांकिकेने दाखवला. ‘तो’ चहा आणि ‘ती’ कॉफी याचे गंमतशीर मिश्रण म्हणजे चफी. अशा वेगळ्या नावाच्या एकांकिकेने रसिकांना करमणुकीबरोबरच लिंगभाव समजून घेण्याचा संदेशही दिला.
प्रा. मिलिंद दांडेकर यांनी प्रास्ताविक केले. संतोष आबाळे यांनी सूत्रसंचालन केले. सारंग भांबुरे यांनी आभार मानले. येथील श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात सादर झालेल्या एकांकिकांना शहर व परिसरातील रसिकांची उपस्थिती होती. एकांकिका सादरीकरणाने चार दिवसीय मराठी दिन महोत्सवाचा समारोप करण्यात आला.