
महापालिकेचे उत्पन्न स्त्रोत धूळखात
05852, 05853
इचलकरंजी : १) आवळे मैदानात नव्याने बांधण्यात आलेले व्यापारी गाळे वापराविना पडून आहेत. २) गाळ्यांची शटर उघडी असून या ठिकाणी पार्ट्यांमुळे प्लास्टिक ग्लास, पिशव्या असा कचरा साचला आहे.
व्यापारी गाळे वर्षभर वापराविना
उत्पन्नाच्या स्त्रोतांकडे दुर्लक्ष; कोट्यवधी खर्चलेल्या इमारतींचा योग्य विनियोग नाही
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १५ : महापालिकेच्या अनेक वास्तू आजही वापराविना पडून असताना उत्पन्नाचे स्त्रोत जिवंत करण्याचा प्रयत्न मात्र फोल ठरत आहे. अशातच आवळे मैदान येथे नव्याने बांधण्यात आलेले व्यापारी गाळे संकुल गेले वर्षभर वापराविना धूळ खात पडून आहेत. महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे सध्या हे गाळे केवळ धुळीचे बाहुले बनले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या या नवीन गाळ्यांचे वेळेत वाटप केल्यास नवीन उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होण्यास मदत होईल.
गेल्या वर्षापासून आवळे मैदानात व्यवसायांसाठी गाळे संकुल बांधून पडलेले आहेत. मुख्य बाजारपेठेच्या मार्गालगत तसेच थोरात चौक ते मलाबादे चौक या व्यापाराला अनुकूल असलेल्या मार्गावर हे गाळे उभारण्यात आले आहेत. प्रशासकीय कार्यकाळामध्ये या गाळ्यांचे वाटप करून उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण करणे सहज शक्य असल्यास महापालिका आयुक्त यावर लक्ष देतील, अशी अपेक्षा होती; मात्र अद्याप याचे वाटप झालेले नाही. अनेक वेळा मागणी करण्यात आली; मात्र प्रशासन त्यावर लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. या गाळ्यांचे नियोजन करून त्याचे वाटप केल्यास निश्चितच सर्वसामान्यांना व्यवसायाची संधी उपलब्ध होईल आणि त्यासोबतच महापालिकेच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात भर टाकण्याला मदत होणार आहे.
महापालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढवण्यासाठी प्रशासनातर्फे सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. थकबाकीदारांकडून वसुलीसाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या माध्यमातून महापालिकेचा मोठ्या प्रमाणात उत्पन्नवाढ करण्याचा प्रयत्न यशस्वी होत असला तरी त्यादृष्टीने नवीन वास्तूकडे लक्ष देण्याची गरज आहे. आवळे मैदानातील गाळे संकुलाची स्थिती फार दयनीय अशी झाली आहे. रंगवलेल्या भिंतीचा रंग गायब होत आहे. सुमारे १५ गाळे बेवारस स्थितीत असल्यासारखे आहेत.
-------------
चौकट
गाळ्यांमध्ये नशाबहाद्दरांचा ताबा
नव्या गाळ्यांमध्ये नशाबहाद्दरांची गर्दी होत आहे. गाळे संकुल उभारले असले तरी एकाही गाळ्याला अद्याप कुलूप लावून बंद करण्यात आलेले नाही. नव्या कोऱ्या गाळ्यांची शटर उघडी असून रात्रीच्या वेळी याठिकाणी नशाबहाद्दरांची पार्टी चालते. अनेक गाळ्यांमध्ये प्लास्टिक ग्लास, पिशव्या मोठ्या प्रमाणात साचल्या आहेत.
----
कोट
आवळे मैदानातील सर्व गाळ्यांचे मूल्यांकन करण्यात आलेले आहे. वसुलीचे काम थांबल्यानंतर लवकरच ई-लिलाव पद्धतीने गाळ्यांचे वाटप केले जाणार आहे.
सचिन पाटील, मिळकत पर्यवेक्षक, महानगरपालिका.