
खुनी हल्ला
पत्नीवर खुनी हल्ला करुन
पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
इचलकरंजीतील घटनाः पुणे येथे रहायला जाण्यावरून वाद
इचलकरंजी, ता.३१ : पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडीचे घाव घालत खुनी हल्ला केल्याची घटना येथे आज घडली. हा हल्ला केल्यानंतर पतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात साक्षी श्रीतेज पागडे (वय १९, रा. पुणे) ही गंभीर झाली आहे. या प्रकरणी पती श्रीतेज चंद्रकांत पागडे (वय २५, रा. विकासनगर. सध्या रा. लालनगर) याच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुणे येथे रहायला जाण्याच्या कारणावरून दोघांमध्ये टोकाचा वाद झाला होता. सध्या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, श्रीतेज व साक्षी यांचा काही महिन्यांपूर्वी विवाह झाला आहे. दोघांमध्ये काही दिवसांपासून पुणे येथे राहण्यास जाण्यावरुन वाद सुरू होता. यातून दोघांचा वाद टोकाला पोहचला. श्रीतेज याने पत्नीला मारहाण करत डोक्यात हातोड्याचे घाव घातले. या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. यानंतर श्रीतेजने घराच्या वरच्या मजल्यावर जावून गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आसपासच्या नागरिकांनी याठिकाणी धाव घेवून दारात जखमी अवस्थेत पडलेल्या साक्षीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तर वरच्या मजल्यावरील दार फोडून आत्महत्या करण्यापासून श्रीतेजला परावृत्त केले. याप्रकरणी श्रीतेज बागडे याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळी पोलिस उपाधीक्षक रामेश्वर वैंजणे, पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार यांनी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भागवत मुळीक करत आहेत.