पोलिस वृत्त पट्टा

पोलिस वृत्त पट्टा

Published on

दुरुस्तीला आलेले तीन गिअर बॉक्स चोरले

इचलकरंजी : दुरुस्तीला आलेले तीन गिअर बॉक्स चोरीला गेल्याप्रकरणी गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चोरट्याने सुमारे ३० हजार रुपयांचे गिअर बॉक्स चोरल्याची फिर्याद अमरनाथ रामचंद्र सुतार (वय ४१) यांनी पोलिसात दिली. इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर लिमिटेड या कंपनीकडून सुतार यांच्याकडे तीन गिअर बॉक्स दुरुस्तीसाठी आले होते. चोरट्याने यावर डल्ला मारला. ही घटना येथील जुनी नगरपालिका फायर फायटरसमोर घडली.
----------

इचलकरंजीत अपघातात दोघे तरुण जखमी

इचलकरंजी : दुचाकींची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. कैफ इमरान जमादार (वय १६), पवन विश्वास लोखंडे (दोघे रा.इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. याप्रकरणी किरण शिवाजी सांगावे (वय ३४, रा. संग्राम चौक) याच्यावर गावभाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात मुख्य मार्गावर धान्य ओळ चौकात घडला. जमादार व लोखंडे जुन्या नगरपालिका मार्गावरून मोपेडवरून घरी जात होते. यावेळी मलाबादे चौकमार्गे समोरून किरण सांगावे दुचाकीवरून भरधाव येत होते. त्यांनी मोपेडला जोराची धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात पवन लोखंडे याला डोक्याला गंभीर इजा झाली. तर जमादार यांच्या हाताला व कमरेला जोराचा मार लागला. तसेच मोपेड वाहनाचे २ हजार रुपयांचे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद जखमी कैफ जमादार यांनी पोलिसांत दिली.
------

कबनूर येथे मटकाप्रकरणी कारवाई

इचलकरंजी : कबनूर (ता. हातकणंगले) येथे मटक्याच्या चिठ्ठ्या घेणाऱ्या‍ दोघांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली. रोहित दिगंबर काळबेरे (वय २७) आणि अजित कोरवी (दोघे रा. इचलकरंजी) अशी त्यांची नावे आहेत. कबनूर हायस्कूलसमोरील मार्गालगत ही कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि दुचाकीसह ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच छापा टाकून अवैध मद्य विक्री करणाऱ्या‍सही अटक केली असून हणमंत यशवंत कोरवी (वय ४१) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून मद्याच्या २१ बाटल्या जप्त केल्या आहेत.
-----------

कोरोची येथे मटका घेणाऱ्या‍ तिघांना अटक

इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथे पोलिसांनी छापा टाकून मोबाईलवर मटका घेणाऱ्या‍ तिघांना अटक केली. नारायण मारुती वगरे, उमेश माणिक तेलगे (वय ३३, दोघे रा. इचलकरंजी), निलेश रामदास हजारे (वय २४, रा. कोरोची) हे तिघे मोबाईलवर मटका घेताना रंगेहाथ सापडले. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख १२ हजार ५००, ३ दुचाकी, ५ मोबाईल यासह मटका जुगाराचे साहित्य असा १ लाख ७९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलिस उपधक्षक समीरसिंग साळवे यांच्या पथकाने शनिवारी (ता.१७) रात्री कोरोची येथील आवळे हायस्कूलच्या मागे नारायण वगरे याच्या घरात केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.