अंधत्वावर कष्टाने मात करून यश

अंधत्वावर कष्टाने मात करून यश

लोगो ः मनोरंजन-प्रबोधन व्याख्यानमाला
-----------------
08683
इचलकरंजी : मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत तिसऱ्या दिवशी डॉ. भावेश भाटिया यांनी अनुभवकथन करत प्रेरणादायी विचार मांडले.

अंधत्वावर कष्टाने मात करून यश
डॉ. भावेश भाटिया : ‘अंधेरे से उजाले की ओर’वर व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १५ : शारीरिक अपंगत्वामुळे जीवनात मला यशस्वी होता येणार नाही, असा विचार करण्यापेक्षा मी या समस्येचे संधीत रूपांतर करण्याचा मार्ग शोधला. एकविसाव्या शतकात तुमच्या पाठीशी जागृत समाज असताना अंध, अपंग ही समस्या फार मोठी नाही. लहानपणापासून आपले अंधत्व ही समस्या समजण्यापेक्षा त्यावर मात करण्याचा विचार केला आणि कष्टाने यश मिळवले, असे उद्‍गार राष्ट्रीय कीर्तीचे प्रेरणादायी उद्योजक, वक्ते डॉ. भावेश भाटिया (महाबळेश्वर) यांनी काढले.
श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात मनोरंजन व प्रबोधन व्याख्यानमालेत तिसऱ्या दिवशी ‘अंधेरे से उजाले की ओर’ या विषयावर ते बोलत होते. बालमुकुंद तोष्णीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त गुलाबचंद तोष्णीवाल, मर्दा फाउंडेशनचे अध्यक्ष भिकुलाल मर्दा, सुरेश चौगुले, समीर गोवंडे, सुनील सारडा यांच्या हस्ते शिवप्रतिमा पूजन केले.
भाटिया म्हणाले, ‘महाबळेश्वरमधील एक हातगाडी भाड्याने घेऊन मी व्यवसायास सुरुवात केली. त्यावेळी माझी हातगाडी अनेक वेळा फेकून दिली. त्या त्रासातूनच माझी जिद्द वाढली आणि मी राष्ट्रपती पदक मिळवण्यापर्यंत वाटचाल केली. अनेक अंधांच्या आयुष्यात जगण्याचा प्रकाश देणारा हा उद्योग जगभर पसरला. ग्रह, तारे, ताईत, गंडेदोरे यामुळे काही फायदा होत नसतो. जीवनात होणाऱ्या त्रासाबद्दल दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आपले जीवन चांगले घडविणे हेच महत्त्वाचे आहे. उद्योग, व्यवसायातून फक्त पैसे मिळवण्याचा उद्देश न ठेवता समाजासाठी आपल्या काही उत्पन्नाचा उपयोग व्हावा त्यादृष्टीने दातृत्वाची भावना सर्वांनी जपायला हवी.’
पुढे डॉ. भाटिया यांनी एक यशस्वी उद्योजक म्हणून आपली वाटचाल सांगत व्यक्तिगत जीवनात एक आंतरराष्ट्रीय खेळाडूबाबत आवर्जून सांगितले. पदके मिळवली याचा मला अभिमान जरूर आहे. पण, यातून स्वतःचा मोठेपण सांगण्याचा उद्देश नसून युवकांनी आपण विशिष्ट ध्येय ठेवून, कठोर परिश्रमाने कार्य करावे आणि आपल्या क्षेत्रात यश प्राप्त करावे. आम्ही हजारो अंध, दिव्यांग व्यक्ती एकत्र येऊन राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करू शकतो, तर शारीरिक दृष्टीने व्यवस्थित असणाऱ्या व्यक्तीही निश्चितच यश मिळवू शकतात, असे विचार भाटिया यांनी मांडले. मनोरंजन मंडळाचे कार्यवाह दत्ता टोणपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. अतुल शहा यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. संतोष आबाळे यांनी आभार मानले.
---
उभे राहून टाळ्यांची मानवंदना
शंभर टक्के दृष्‍टीहीन असूनही एक ध्येय समोर ठेवून कार्य करण्याचे ठरवले आणि साडेनऊ हजार दृष्‍टीहीन बांधवांना सोबत घेऊन सनराईज कॅण्डल ही कंपनी डॉ. भाटिया यांनी उभी केली. भाटिया यांचे कर्तृ‍त्‍व आणि प्रेरणादायी वक्तृत्वामुळे नाट्यगृह भरून गेले होते. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रसिक श्रोत्यांनी उभे राहून त्यांना टाळ्यांची मानवंदना दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com