उन्हाळ्यात घरफोडी वाढल्या

उन्हाळ्यात घरफोडी वाढल्या

फोटो - संग्रहित

उन्हाळ्यात घरफोडी वाढल्या
चोरट्यांकडून यावर्षी बंद घरे लक्ष्य : इचलकरंजीत १३ ठिकाणी चोरी
ऋषिकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ : उन्हाळ्यात लग्नसराई, शाळा-महाविद्यालयांच्या सुट्या सुरू झाल्यानंतर नागरिक घरे बंद करून गावी, सहलीला निघून जातात. यंदा याच काळाचा फायदा उठवत शहरात चोरट्यांनी बंद घरे फोडून मौल्यवान वस्तू चोरून नेल्या. तीन महिन्यांत बंद घरे हेरून चोऱ्या करण्याच्या घटना वाढल्या असून, तब्बल १३ घरफोडींच्या घटना घडल्या. दरवर्षी उन्हाळी सुटीत चोरट्यांचा क्रम बदलत असून, गतवर्षी उघड्या घरांतील चोऱ्या तर यंदा घरफोडीचे सत्र दिसून आले आहे.
शहरातील अद्याप बहुतांश सीसीटीव्ही बंद असल्याने चोरटे सहज बंद घरे लक्ष्य करून फोडू लागले आहेत. बंद घरात काय आहे किंवा काय नाही याची खातरजमा करून सोन्याच्या दागिन्यांचा सुपडासाफ करीत आहेत. प्रत्येक ठिकाणी घरमालकांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. मोठमोठी अपार्टमेंट असली तरी सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले नाहीत. सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. त्यामुळे चोरट्यांना काहीच भीती राहिलेली नाही. तपास करताना पोलिसांना चोरट्यांबाबत काहीच पुरावा मिळत नाही. त्यामुळे या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हे रोखण्याचे आव्हान पोलिसांसमोर असताना उन्हाळ्यात पुन्हा पोलिसांची चिंता वाढवणारी ठरली आहे.
उन्हाळ्यापासून घरफोड्यांचे गुन्हे वाढत आहेत. मार्चमध्ये शिवाजीनगर, शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाच घरफोड्या झाल्या. शिवाजीनगर हद्दीत एकाच भागात सलग दोन घरफोड्या झाल्या. एप्रिलमध्ये केवळ एकच घरफोडी झाली. मात्र, मे महिन्यात चोरट्यांनी धुमाकूळच घातला. पुन्हा शिवाजीनगर, शहापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतच प्रत्येकी तीन घरफोड्या झाल्या. चोरट्यांनी बंद घरांसह बंद दुकाने, कारखाने, सहकारी संस्थांही टार्गेट करून चोऱ्या केल्याचे समोर आले आहे. एकूण १३ घरफोड्या करून चोरट्यांनी १८ लाख ६६ हजार १७२ रुपयांचा मुद्देमाल पसार केला. यातील एकाही घरफोडीचा गुन्हा पोलिस उघडकीस आणू शकलेले नाहीत. त्यामुळे आता उन्हाळ्यात चोऱ्या होऊ नयेत म्हणून नागरिकांनीच अधिक दक्ष राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
------
घरफोडी (मार्च ते मे)
पोलिस ठाणे* गुन्हे
शिवाजीनगर* ७
गावभाग* १
शहापूर* ५
एकूण* १३
------
पोलिस मागे, चोरटे पुढे
१३ घरफोड्यांमध्ये चोरट्यांनी पुरावे मागे न सोडता पुरावे घेऊनच पसार झाले. कपाटांचे लॉक न तोडता दरवाजाखालून कोयंडा घालून दोन कपाटे सहज उघडली. घरात प्रवेश करताना मुख्य दरवाजाचे कुलूप न तोडता दरवाजाला भगदाड पाडत आत प्रवेश केला. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्‍या बाहेरील बाजूला फिरवत चोरी करून परतताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा डीव्हीआरही चोरून नेला. असे सराईत चोरटे सुसाट असून, पोलिस मात्र त्यांच्या मागेच आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com