झाडांच्या सेवेतून पर्यावरण दिन

झाडांच्या सेवेतून पर्यावरण दिन

08838
इचलकरंजी : ग्रीन इचलकरंजीच्यावतीने भगतसिंग उद्यानात बीजांचे रोपण करण्यात आले.

झाडांच्या सेवेतून पर्यावरण दिन
विविध उपक्रम ः पर्यावरणप्रेमी, संस्था, संघटनांतर्फे वृक्षारोपण, बीजारोपण, श्रमदान
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ५ : जागतिक पर्यावरण दिन ठिकठिकाणी विविध उपक्रमांसह पर्यावरण वाचवण्यासाठी प्रत्येक जण साजरा करताना दिसला. प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरणीय संस्‍था, संघटना, प्रशासन आणि पर्यावरणप्रेमींकडून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. वृक्षारोपण, बीजारोपण, श्रमदान करत झाडांच्या सेवेत हा दिन सुपूर्द करण्यात आला. वाढत्या उष्माघातामुळे वृक्षारोपणाची गरज पर्यावरण दिनातून मोठ्या प्रमाणात अधोरेखित झाली. पर्यावरण रक्षणाच्या कृतीला प्रोत्साहन देत हा दिवस साजरा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानिमित्ताने समाजात पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या जबाबदारीच्या दृष्टिकोनातून सामुदायिक जाणीव निर्माण झाली.
* ग्रीन इचलकरंजी
पर्यावरण दिन आणि संस्थेच्या वर्धापन दिनी २७ प्रकारच्या २ हजार ५०० हून अधिक बीजांचे रोपण करण्यात आले. शहीद भगतसिंग उद्यानात उपक्रम राबवण्यात आला. मोई, वारंग, रोहितक, फणशी, तामण, रक्तवल्ली, शमी, रानभेंडी, तिवस, टेंभूर्णी, रिठा, दुर्मिळ देवसावर, अर्जुन, बेहडा, कुंकूफळ, मास रोहिणी, नाणा, काळा कुडा, वावळ, रान जांभूळ, मोठा जांभूळ, चिंच, ऐन आदी बियांचे रोपण करण्यात आले. यामध्ये प्रत्येक प्रकारच्या शंभर बियांचा समावेश करण्यात आला. पुढे उगवलेल्या रोपांची काळजी भगतसिंग बागेतील माळी बांधव, ग्रीन इचलकरंजीचे सदस्य आणि निसर्गप्रेमींनी घेण्याचे ठरले. यासाठी ग्रीन इचलकरंजी संस्था, इचलकरंजी महानगरपालिका, देवराई फाउंडेशनचे सुहास कडू यांचे सहकार्य लाभले.
* डीकेएएससी महाविद्यालय
वृक्षांचे महत्त्व जपत महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विविध देशी झाडांचे रोपण प्राचार्य डॉ. एस. एम. मणेर यांनी केले. डॉ. मणेर यांनी पर्यावरणातील झाडांचे महत्त्व सांगत बदलाचे परिणाम स्पष्ट केले. जिमखाना प्रमुख प्रा. विनायक भोई, प्रा. रोहित शिंगे आदी उपस्थित होते.
* कर्तव्य फाउंडेशन
कर्तव्य फाउंडेशन आणि लिंगायत रुद्रभूमी समितीमार्फत वृक्षारोपण करण्यात आले. लिंगायत रूद्रभूमी येथे अनेक झाडांचे रोपण करण्यात आले. कलगोंडा पाटील, वृक्षप्रेमी सचिन मडीवाळ, रूद्रभूमीचे उपाध्यक्ष राजू कोरे - तारदाळे, नागेंद्र पाटील, उमेश पाटील आदी उपस्थित होते. संस्था झाडे लावा झाडे वाचवा ही मोहीम नव्हे, तर एक चळवळ म्हणून अनेक वर्षे काम करत आहे.
* संविधान परिवार
मालती माने विद्यालय आणि सरस्वती हायस्कूल परिसरात झाडे लावण्यात आली. शाळेच्या ट्रस्टने विविध झाडे उपलब्ध करून दिली. वृक्षमित्र नीलेश बनगे, वैभवी आढाव, रोहित दळवी, दामोदर कोळी, सौरभ पोवार, आदित्य धनवडे, अवी आढाव आदी उपस्थित होते. नियोजन मुख्याध्यापक संजय रेंदाळकर यांनी केले.
* ऑक्सिजन पार्क, जांभळी
तरुणाईने उभारलेल्या १२ एकर परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये झाडांची सेवा करत पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. महिला व तरुणांनी श्रमदान केले. अनेकांनी विविध देशी झाडांचे रोपण करून माहिती जाणून घेतली. परिसरातील विविध पर्यावरणप्रेमी व नागरिकांनी ऑक्सिजन पार्कला भेट दिली. प्रत्यक्ष कृतीतून पर्यावरण दिन साजरा करण्याच्या कार्याला प्रतिसाद मिळाला. सलमान कुडचे, सचिन पाटील, विनायक भुयेकर, गोविंद जाधव आदींनी नियोजन केले.
*चंदूर क्रिकेट स्पोर्टस्
कबनूर ः चंदूर (ता. हातकणंगले) येथील चंदूर क्रिकेट स्पोर्टसतर्फे विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. कुमार व कन्या शाळेच्या ठिकाणी लिंब, वड, बदाम, चिंच, करंज, गुलमोहर, सुबाभळी आदी वृक्ष लावण्यात आले. त्याचे संवर्धन व संगोपनाची जबाबदारी चंदूर स्पोर्टसने प्रत्येक खेळाडूवर देऊन गावात जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला. उमेश पाटील, उत्तम पाटील, चिन्मय पाटील, शीतल पाटील, दत्ता लवटे, सुधीर पुजारी, रजत पुजारी आदींचा सहभाग होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com