२४८ पैकी पाचच सीसीटीव्ही सुरू
२४८ पैकी पाचच सीसीटीव्ही सुरू

२४८ पैकी पाचच सीसीटीव्ही सुरू २४८ पैकी पाचच सीसीटीव्ही सुरू

09055

सीसीटीव्ही संग्रहित.
-------------
२४८ पैकी पाचच सीसीटीव्ही सुरू
इचलकरंजीत पोलिसांसमोरूनच बेशिस्त वाहनचालक सुसाट
ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २ : शहरातील वाहतुकीला शिस्त लावणारा तिसरा डोळा आजारी पडल्याने वाहतुकीची शिस्त फार बिघडून गेली आहे. २४८ पैकी केवळ पाच सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असल्याने कारवाईला मर्यादा येऊ लागल्या आहेत. सीसीटीव्ही यंत्रणेने पूर्णतः डोळे झाकल्याने सीसीटीव्हीद्वारे होणाऱ्या कारवाईचा आलेख तळाशी गेला आहे. परिणामी आता बेशिस्त वाहनचालक सीसीटीव्हीच्या तिसऱ्या डोळ्यापासून वाचत असून वाहतूक पोलिसांच्या समोरूनच सुसाट पळ काढत असल्याचे सर्रास दिसत आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना जरब बसावी, यासाठी वाहतूक पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून दंड आकारण्यास पाच वर्षांपूर्वी सुरूवात केली. पहिल्या वर्षात या कारवाईचा वेग वाढत गेला. यातून वाहतूक नियम मोडणाऱ्या चालकांवर चांगलाच चाप लावला. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा वाहतूक पोलिसांसाठी फार प्रभावी ठरली. मोबाईल टॉकिंग, विना सीटबेल्ट, रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीटसारख्या सुसाट धावणाऱ्या बेशिस्त वाहतुकीला लगाम बसला; मात्र सीसीटीव्ही यंत्रणेचे वीज बिल आणि देखभाल दुरुस्तीचा विषय येण्यास सुरुवात झाली आणि पालिका व पोलिस प्रशासन एकमेकांकडे बोट दाखवत राहिले. अशा जबाबदारीच्या परिस्थितीत सीसीटीव्हीकडे दुर्लक्ष झाले.
मुख्य मार्गासह विविध २४८ ठिकाणी बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे वारंवार देखभालीअभावी हळूहळू बंद पडले. याची झळ वाहतूक शाखेला सर्वाधिक बसली. नव्याने सात ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली. तेथे वाहनचालकांमध्ये शिस्त आणण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या तोकड्या यंत्रणेसमोर सीसीटीव्हीशिवाय पर्याय नव्हता. जानेवारी २०२३ पासून पोलिस दलाच्या निधीतून शहरातील बंद पडलेल्यांपैकी ४० टक्के सीसीटीव्ही कॅमेरे सुरू केले; मात्र वर्षभरात तेही बंद पडले आणि वाहतूक व्यवस्थेला बाधा आली. सध्या गांधी पुतळा चौक परिसरात केवळ पाच सीसीटीव्ही कॅमेरे सुरू असून याच भागात बेशिस्त वाहनांवर कारवाई होते; मात्र इतर ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याने वाहनधारक बेधडकपणे नियम मोडत आहेत. त्यामुळे बिघडलेल्या वाहतूक व्यवस्थेला शिस्त आणण्यासाठी व वाहतूक नियोजनासाठी सीसीटीव्हीची गरज अधोरेखित होताना दिसत आहे.
---
सीसीटीव्ही कारवाई दृष्टिक्षेप (ग्राफ करणे)
वर्ष* कारवाई* दंड
२०२१* १४,९०८*३२,००२००
२०२२* २५८५*२०,०५,०००
२०२३* ४६६२* ६५,६३,६००
२०२४* २०२३*३०,९१,७०६
(जूनपर्यंत)
---
सीसीटीव्ही
एकूण - २४८
सुरू - ५
बंद -२४३
एकूण खर्च - २,९३,३,५०५ (दोन टप्प्यांत)
ःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःःः---
वाहतूक शाखेचा पत्रव्यवहार
वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईपेक्षा सीसीटीव्हीद्वारे होणाऱ्या कारवाईचे प्रमाण जास्त असते; मात्र चार वर्षांपासून सीसीटीव्हीच्या कारवाईत कमालीची घट झाल्याने वाहतूक पोलिसांची चिंता वाढली आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने पालिकेसह वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यातून देखभाल दुरुस्तीचे काम झाल्यास सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत सुरू होऊ शकते.
---
सिग्नल सहज तोडतात
नव्याने सात ठिकाणी सिग्नल सुरू होताच वाहनधारक सिग्नल तोडू लागले होते. सीसीटीव्ही यंत्रणा प्रभावी नसल्यामुळे पहिल्या दोन महिन्यांत सिग्नल तोडणाऱ्या तब्बल एक हजार चार जणांवर कारवाई केली. आताही परिस्थिती फारशी वेगळी नाही. सिग्नलवर न थांबता सुसाट जाणाऱ्या अशा वाहनांना सीसीटीव्हीतून कारवाईची जरब महत्त्वाची ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com