गांजाच्या झुरक्यात वस्त्रनगरी धुमसतेय

गांजाच्या झुरक्यात वस्त्रनगरी धुमसतेय

Published on

गांजा संग्रहित वापरणे

गांजाच्या झुरक्यात वस्त्रनगरी धुमसतेय
अल्पवयीन मुले नशेच्या आहारी ः पोलिसांचे सोयीस्कर दुर्लक्ष
ऋषिकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ४ : सकाळी शाळेला गेलेला मुलगा आईवडिलांना रात्री गांजाच्या नशेत घाणीत दिसतो. दुपारी शाळा सोडून मुले नशेत गुंतलेली असतात. निर्जन स्थळी गांजा ओढताना कारवाईत आढळणारी सर्वाधिक अल्पवयीन मुलेच आणि याच नशेत खंडणी मागत दिसेल ती वाहने, दुकाने फोडणारी मुले असे सारे चित्र सध्या इचलकरंजी शहरात पाहायला मिळत आहे. वजनकाट्यासह बिनधास्तपणे रेकॉर्डवरील गुन्हेगार खुलेआम गांजा विक्री करत आहेत आणि अल्पवयीन मुले या नशेच्या आहारी जाऊन गुन्हेगारीकडे वळत आहेत. गांजाच्या झुरक्यात सध्या वस्त्रनगरी धूमसत आहे. हे सर्व काही समोर घडत असूनही पोलिस मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत.
संघटित गुन्हेगारांचे आगर अशी ओळख बनलेल्या वस्त्रनगरीत कालानुरूप गुन्हेगारीचे स्वरूप बदलत चालले आहे. मोका कारवाईत तर शहराने कळस गाठला आहे. अशा परिस्थितीत रेकॉर्डवरील गुन्हेगार काही शांत बसताना दिसत नाहीत. मिसरुडही न फुटलेल्या अल्पवयीन मुलांच्या जीवनात नशेचा बाजार भरवून जगण्याची दिशाच ते भरकवटत आहेत. गांजा हा सहज व कमी किमतीमध्ये मिळत असल्याने अनेक ठिकाणी वीस ते तीस रुपयांपासून गांजाच्या पुड्या सहज मिळतात. एका पुडीमध्ये पाच ते दहा ग्रॅम गांजा असतो. काही विशिष्ट ठिकाणी थांबून, तर कुठे-कुठे फिरून त्याची मागेल तशी विक्री केली जाते. तसेच अलीकडे काही पान टपरीचालकांकडून गांजाची नशा पसरत असल्याची चर्चा आहे.
यापूर्वी सांगली, मिरज भागांतून गांजा शहरात विक्रीसाठी येत असल्याचे स्पष्ट होत होते; मात्र आता कर्नाटकातून मोठे रॅकेट इचलकरंजीशी थेट जोडले गेले आहे. पुढे कोल्हापूर ते पश्‍चिम महाराष्ट्रात या धंद्याची साखळी कार्यरत असल्याचे बोलले जाते. शहरात सध्या जेथे गांजा ओढण्याची ठिकाणे आहेत, तेथे तेथे गांजा पुरवण्याची यंत्रणा स्वतंत्रपणे काम करते. तसेच येथे गांजाचा साठा करून विक्री केली जात असल्याची धक्कादायक बाब शहापूर पोलिसांच्या कारवाईतून समोर आली. गांजाच्या झुरक्याची व्याप्ती शहरातील अल्पवयीन मुलांच्या मनापर्यंत पोहोचली असून ती नशा, खून, तोडफोड, खंडणीसारखे गंभीर गुन्हे सहज करत आहे.
---
गांजा कारवाई
वर्ष* कारवाई
२०२०*११
२०२१* १२
२०२२*४
२०२३* २
२०२४* ३
(जूनपर्यंत)
------
कारवाई होते, तरी गांजा मिळतोच
चिरीमिरीच्या मोबदल्यात गांजाबाबत कारवाई करताना पोलिस अग्रेसर दिसत नाहीत. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार एखाद्या सायंकाळपासून रात्रीपर्यंत गांजाबाबत कारवाई होते; मात्र त्यानंतर पुन्हा गांजाच्या कांड्या पेटवल्या जातात. शहरातील कामगार वस्त्यांमध्ये सर्वाधिक गांजाची खुलेआम नशा सुसाट आहे. पोलिसांचा तपासच पुढे जात नसल्याने पोलिसांना गांजा विक्रीच्या मुळाशी पोहोचता येताना दिसत नाही.
----
नशेखोरांचे अड्डे
* मैल खड्डा कचरा डेपो
* स्टारनगर यड्राव फाटा
* तुळजाभवानी अपार्टमेंटसमोर
* साईट नं. १०२ मोकळी मैदाने
* इचलकरंजी - टाकवडे मार्ग
* वडगाव बाजार समिती
* मुसळे विद्यालय परिसर
* बोहरा मार्केट पाठीमागे
* वखारभाग
* मंगलधाम परिसर
* राणी बाग पूर्व भाग
* कबनूर ओढा
* नदीवरील जॅकवेल
*नदिवेस तोडकर मळा
*जुनी चंदूर विहीर
*महानगरपालिका बंद शाळा
* मोकळी मैदाने.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.