खून तीन अटक

खून तीन अटक

Published on

इचलकरंजीत अल्पवयनीचा निर्घृण खून
घोडागाडी शर्यतीचा वादातून प्रकार; तिघे संशयित ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.४ : घोडागाडी शर्यतीवेळी आडवे आल्याने पहिला क्रमांक हुकल्याचा राग मनात धुमसत होता. त्यातच घोडागाडी परत मागितल्याचे कारण ठरले आणि एका तरुणाने दोघांच्या साथीने एका मित्राचा निर्घृण खून केला. धारदार शस्त्राने सपासप वार करून झालेल्या खुनी हल्ल्यात अल्पवयीन सुशांत दीपक कांबळे (वय १७, रा.आसरानगर) याचा जागीच मृत्यू झाला. वार इतके तीक्ष्ण होते की सुशांत याच्या पाठीत मारलेल्या धारदार शस्त्राचे टोक छातीतून बाहेर आले होते. खुनाचा हा प्रकार शहापूर येथील एका शाळेच्या मागे उघड्यावर सकाळी साडेसातच्या सुमारास उघडकीस आला.
याप्रकरणी शहापूर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व शहापूर पोलिस ठाणे यांच्या संयुक्त पथकाद्वारे तपास सुरू केला. पथकाने अवघ्या चार तासांतच खूनप्रकरणी तीन संशयितांना अटक केली. अतिष ऊर्फ टक्या दत्तात्रय नेटके (१९, रा.१०२ सहकारनगर), आर्यन सरदार चव्हाण (२१ रा. गणेशनगर, इचलकरंजी), रेकॉर्डवरील गुन्हेगार बाळू ऊर्फ प्रदीप पारस यादव (२६ रा. जे. के. नगर, शहापूर) अशी त्यांची नावे आहेत. कोल्हापुरातील एका कॉलेजच्या बाजूला असलेल्या मैदानातून तिघांना ताब्यात घेतले. तिघांनी खुनाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः शहापूरमधील एका शाळेच्या मागील जागेत पहाटे व्यायामासाठी नागरिक जमतात. यावेळी नागरिकांना रक्तबंबाळ अवस्थेत एका मुलाचा मृतदेह आढळून आला. याबाबत शहापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस उपअधीक्षक समिरसिंह, पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मुलाचा तोंडावर, छातीवर, पाठीत धारदार शस्त्राने गंभीरपणे वार करून खून केल्याचे समोर आले. सुशांत याच्या मोबाईलवर आलेल्या कॉलवरून हल्लेखोरांचा शोध सुरू केला.
संयुक्त पथकाने कोल्हापुरातून संशयित नेटके, चव्हाण, यादवला ताब्यात घेतले. महिन्याभरापूर्वी झालेल्या घोडागाडी शर्यतीवेळी सुशांत आडवा आल्याने पहिला क्रमांक हुकला होता. तसेच त्याने घोडागाडी परत मागितल्यावरून वाद झाला होता. त्यातून सुशांतचा धारदार शस्त्राने खून केल्याची कबुली तिघांनी दिली.

आईचा फोन अन् ओळख पटली
घटनास्थळी मृतदेहाजवळ काही हत्यार किंवा ओळख पटण्यासाठी काही मिळते काय, याचा पोलिस शोध घेत होते. तेथील संरक्षक भिंतीलगत मोबाईल मिळून आला; मात्र मोबाईल बंद असल्याने पोलिसांनी तो चार्जिंगला लावला. मोबाईल सुरू झाल्यानंतर त्यावर सुशांतची आई, तसेच भावाचा फोन आला आणि सुशांतची ओळख पटली.

हल्लेखोरांचा असा लागला शोध
सुशांतच्या आईकडे असलेल्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला आणि फोन करणाऱ्याने सुशांत जिवंत आहे काय, अशी विचारणा केली. ही माहिती पोलिसांना मिळाली. त्यांनी या अऩोळखी क्रमांकाचे लोकेशन काढले आणि त्यावरून तिघा हल्लेखोरांना कोल्हापुरातून ताब्यात घेतले.

94835 - आर्यन चव्हाण, अतिष नेटके, प्रदीप यादव
------------------------------------------------------

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.