महावितरणकडून देखभाल, दुरुस्ती सुरू

महावितरणकडून देखभाल, दुरुस्ती सुरू

Published on

09113
इचलकरंजी : ‘महावितरण’ने कृषिक्षेत्रात देखभाल, दुरुस्तीच्या कामाला गती दिली आहे.

‘महावितरण’कडून देखभाल, दुरुस्ती सुरू
विजेचा धक्का लागण्याच्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजीत खबरदारी ः पथके दाखल
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ : पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना विजेचा धक्का लागण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. विविध भागांतून या घटनांचे प्रमाण वाढत असून शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात आले आहे. या समस्येवर इचलकरंजी विभागात ‘महावितरण’ने तातडीने उपाययोजना करत देखभाल व दुरुस्तीच्या कामाला गती दिली आहे. यासाठी सध्या राज्याच्या अन्य भागातूनही पथके दाखल झाली आहेत.
‘महावितरण’कडून प्रतिवर्षी पावसाळ्यात सुरक्षिततेसाठी व वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी मॉन्सूनपूर्व देखभाल-दुरुस्तीची कामे केली जातात. यंदाही ही कामे उन्हाळ्याच्या दिवसातच केली. मात्र आता पावसाळा सुरू होताच वीजवाहक तारा शेतकऱ्यांच्या जीवावर उठताना दिसत आहेत. येथील एका शेतात चार दिवसांपूर्वी लोंबकाळणाऱ्या विद्युत तारांचा धक्का बसून जखमी झालेल्या शेतकऱ्याची प्रकृती अद्याप गंभीर आहे. इचलकरंजी ग्रामीण क्षेत्राचा आवाका मोठा असल्याने व देखभाल, दुरुस्तीची कामे नेटकीपणाने न झाल्याने आता ही मोहीम पुन्हा गतीने सुरू आहे. तक्रारीनुसार, तसेच ठिकठिकाणी सर्व्हे केला जात आहे. अडथळे दूर करून कामे मार्गी लावली जात आहेत.
विजेच्या तारांची तपासणी करून तुटलेल्या, झिजलेल्या किंवा सैल झालेल्या तारांची दुरुस्ती केली जात आहे. विजेचे खांबाचे मजबुतीकरण करून जुने आणि कमकुवत खांब बदलले जात आहेत. ट्रान्सफॉर्मरची देखभाल व दुरुस्ती करून त्यांची कार्यक्षमता वाढवली जात आहे. ग्रामीण भागात जुन्या आणि तुटलेल्या जोडण्या बदलून नवीन घालण्यात येत आहेत. तसेच पावसाळ्यातील आपत्ती व्यवस्थापनासाठी विशेष पथके तयार केली असून विद्युत पुरवठा तातडीने पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. ‘महावितरण’च्या या वेगवान कामांमुळे पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकऱ्यांनीही ‘महावितरण’च्या सूचनांचे पालन करून सुरक्षिततेची दक्षता घेणे आवश्‍यक आहे.
----
पावसाळ्यात शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी
*विद्युत खांब, तणाव तारेला (स्टे वायर) जनावरे बांधू नयेत
* शेतामध्ये काम करताना विजेच्या तारा, खांब आणि ट्रान्सफॉर्मरपासून सुरक्षित अंतर ठेवा
* आर्द्र वातावरणात विद्युत उपकरणे वापरणे टाळा
* विद्युत तारा तुटल्यास तातडीने ‘महावितरण’ला कळवा
* विजेच्या तारा ओलांडण्याची घाई करू नका
*शेतातील विद्युत पंप आणि अन्य उपकरणांची नियमित तपासणी आणि देखभाल करा
* प्रत्येक वेळी मोटार चालू-बंद करताना पॅनेल बोर्डला टेस्टर लावून टेस्टरच्या सहाय्याने आधी तपासून घ्या
* पॅनल बोर्ड हाताळताना रबराच्या गमबूटचा वापर करा
* अर्थिंगचे कनेक्शन नेहमी सुस्थितीत ठेवा
-----
विजेच्या धोक्यामुळे संभाव्य अपघातांना आळा घालण्यासाठी गतीने काम करत आहोत. शेतांमध्ये विद्युत तारा तपासणे, खांबांची देखभाल आणि अन्य आवश्यक उपाययोजना तातडीने केल्या जात आहेत.
- सुनील अकिवाटे, उपकार्यकारी अभियंता, महावितरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.