गवा, वानर गेले कुठे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गवा, वानर गेले कुठे
गवा, वानर गेले कुठे

गवा, वानर गेले कुठे

sakal_logo
By

जयसिंगपुरात गव्याची शोध मोहीम सुरूच
जयसिंगपूर, ता. १० : शहरातील कचरे हौसिंग सोसायटी, शिवशक्ती कॉलनी परिसरात सोमवारी मध्यरात्रीपर्यंत धुमाकूळ घालणारा गवा आणि नागरिकांवर हल्ले करून दहशत निर्माण करणारे वानर गेले कुठे, अशी विचारणा करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
वानराने वन्य जीव बचाव पथकाने लावलेल्या सापळ्याकडे पाठ फिरवली. तर मंगळवारी गव्यानेही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना चकवा दिला. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे सावट कायम आहे. आळते (ता. हातकणंगले) येथून प्रवास सुरू झालेल्या गव्याने सोमवारी मध्यरात्रीपर्यंत वन विभागाच्या पथकाला झुलवत ठेवले. बघ्यांची गर्दी आणि गोंधळ सुरू झाल्यामुळे बिथरलेला गवा रात्री उशिरापर्यंत दिसून आला नाही. कोल्हापूर-सांगली महामार्गावरील ऊस शेतात शिरलेल्या गव्याच्या शोधासाठी मंगळवारी पथक कार्यरत राहिले. सायंकाळनंतर तो दिसेल, अशी शक्यता गृहीत धरून पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शोधमोहीम राबवली. शहरातील शाहूनगर नांदणी रोडवरील काही भागात चार दिवसांपूर्वी वानराने हैदोस घातला होता. नागरिकांवर पाठलाग करून हल्ले करणे, मोटरसायकली ढकलून देणे, अचानक घरांमध्ये शिरून हल्ल्याचा प्रयत्न करणे आदी प्रकार या वानराकडून सुरू होते. यानंतर वन्य जीव बचाव पथकाने वानराला पकडण्यासाठी सापळा लावला; पण दररोज आठ दिवस नागरिकांना भंडावून सोडणाऱ्या या वानराने त्यादिवशी सापळ्याकडे पाठ फिरवली.