
त्रास सगळ्यांनाच; पण तक्रार करणार कोण?
त्रास सगळ्यांनाच; पण तक्रार करणार कोण?
जयसिंगपुरातील राखेचा प्रश्न; प्रदूषण नियंत्रण मंडळ, पालिका तक्रारीच्या प्रतीक्षेत
जयसिंगपूर, ता. २५ : ‘राखेचा थर काळवंडले जयसिंगपूरकर’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून बुधवारी (ता. २५) ‘सकाळ’ने नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या. मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या राखेचा शहरवासीयांना त्रास होत असला तरी याबाबत नगरपालिकेच्या आरोग्य विभाग अथवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे शहरातून एकही लेखी तक्रार दाखल केली नसल्याची गंभीर बाबही पुढे आली आहे.
त्रास तर सर्वांनाच होत असला तरी तक्रार दाखल करण्यास मात्र कुणी पुढे येत नाही. दोन वर्षांपूर्वी अशीच राख शहरात पडत होती. त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे लेखी तक्रार केली होती. यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी राखेचे नमुने तपासणीसाठी घेतले. यानंतर काहिंना नोटिसाही बजावल्या होत्या. राख तपासणीचा अहवाल मात्र नागरिकांना कळू शकला नाही.
दोन वर्षांनंतर पुन्हा शहरावर राखेचे संकट आले असताना या वेळी तक्रार करण्यासाठी कुणीच पुढे येत नसल्याची बाब स्पष्ट झाली आहे. माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके यांनी प्रदूषण नियंत्रणच्या अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे. लेखी तक्रारच नसल्यामुळे नगरपालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला कार्यवाही करताना मर्यादा येत आहेत. शहरावर पडणारी राख येतेच कुठून हाच प्रश्न अनुत्तरित आहे. सध्या शहरात मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या राखेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय पिकांवरही राखेचे थर पडत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यात सक्रिय असणाऱ्या कार्यकर्त्यांनी जागे होण्याची गरज आहे.
....
शैलेश आडके यांची तोंडी तक्रार
माजी उपनगराध्यक्ष शैलेश आडके यांनी याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे तोंडी तक्रार केली आहे. श्री आडके यांची तक्रार वगळता एकही तक्रार संबंधितांकडे केली नाही.
....
‘प्रदूषण नियंत्रण’कडून शनिवारी पाहणी
शहरावर पडणाऱ्या राखेचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर तक्रारीची वाट बघणाऱ्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून शनिवारी (ता. २८) राखेची पाहणी केली जाणार आहे.
....
दोन वर्षांपूर्वी असा प्रकार घडला होता. त्यावेळी राखेचे नमुने घेऊन काहिंना नोटिसाही बजावल्या होत्या. आता पुन्हा असाच प्रकार सुरू आहे. शनिवारी पाहणी करून पुढील कार्यवाही करू.
- संजय मोरे,
क्षेत्रिय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
....
पालिकेच्या आरोग्य विभागाकडे राखेबाबत कोणतीही तक्रार आली नाही. तरीही मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी यांच्याशी चर्चा करून प्रशासन निर्णय घेईल.
- संदीप कांबळे,
आरोग्य निरीक्षक, जयसिंगपूर पालिका