
भगवंताच्या नामस्मरणातून सुख प्राप्ती
04780
जयसिंगपूर: महामंडल विधान महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ आराधना महोत्सवात जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी मार्गदर्शन केले.
-----------------
भगवंताच्या नामस्मरणातून सुख प्राप्ती
जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी; मिरवणुकीने जलकुंभ सभामंडपात
जयसिंगपूर, ता. ३१ : सांसारिक जीवनात मनुष्याने भगवंताचे नामस्मरण केल्यास सुखाची प्राप्ती होते, असे मार्गदर्शनी नांदणी संस्थांनचे परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी सोमवारी (ता.३०) येथे केले.
येथील महामंडल विधान महामहोत्सव व विश्वशांती महायज्ञ आराधना महोत्सवात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘श्रावक श्रावकांनी निष्ठापूर्वक भगवंताचे नामस्मरण करावे. भगवंताला हृदयस्थानी ठेवून त्याची मनोमनी भक्ती करावी. आई-वडिलांनी लहान मुलास मुनीश्रींचे दर्शन घडवून नित्य स्वाध्याय जिनवाणीचे ज्ञान द्यावे. चांगली सुसंगत, साधूंचा आशीर्वाद यामुळे दुर्गुणाचा नाश होऊन सद्गुणाची वाढ होते. प्रत्येकाने धार्मिकता जोपासत जैन शास्त्राचे आचरण आणि पालन करावे.’
आपल्या मुला-मुलींना शिक्षणाबरोबर धार्मिक शिक्षण देणे गरजेचे आहे. जयसिंगपूर ही पावनभूमी असल्याने अनेक साधू येत असतात. यापूर्वी अनेक मोठ्या प्रमाणातील धार्मिक कार्यक्रम झाले आहेत. पुढील वर्षी नांदणी येथे भगवान आदिनाथ मूर्ती महामस्तकाभिषेक नऊ दिवसांचा सोहळा आयोजित करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. सोमवारी पाचव्या दिवशी पहाटे मंगल नादाने सुरुवात होऊन सौधर्म इंद्र इंद्रायणी मुख्य चक्रवर्ती यांचे मिरवणुकीने आगमन झाले. मिरवणुकीने जलकुंभ सभामंडपात आणला.
------------
२५० मुलांचे मौजीबंधन
महोत्सवाच्या मंगळवारी सहाव्या दिवशी शहर आणि परिसरातील २५० मुलांचे मौजीबंधन सोहळा झाला. यानंतर त्यांची गावातून शोभायात्रा काढण्यात आली. मुनिश्रींच्या उपस्थितीत हा सोहळा झाला. महोत्सवाच्या ठिकाणी तसेच सर्वच मार्गांवर विद्युत रोषणाई आणि स्वागत कमाने उभारून महोत्सव समितीच्या वतीने भावी श्रावक स्तरावकांचे स्वागत केले जात आहे.