
जयसिंगपूरला शिवजयंतीचे नियोजन
जयसिंगपूरला शिवजयंतीचे नियोजन
जयसिंगपूर, ता.१३ : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती, छत्रपती शिवाजी महाराज मेमोरियल फाउंडेशन व संभाजी ब्रिगेडतर्फे शिवजयंती उत्साहात व भव्य दिव्य प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केल्याची माहिती, माजी नगरसेवक चंद्रकांत जाधव घुणकीकर यांनी दिली.
उद्योजक योगेश सारस्वत व माजी नगरसेवक अर्जुन देशमुख तसेच पराग पाटील यांच्याहस्ते शिवध्वजाचे रविवारी (ता.१९) सकाळी साडेनऊ वाजता पूजन होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता मुख्याधिकारी तैमूर मुल्लाणी व एपीआय रणजीत पाटील तसेच एमएससीबीचे बाबासाहेब सोलगे यांच्याहस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. सायंकाळी साडेपाच वाजता शिवमूर्तीची मिरवणूक होणार आहे. मिरवणुकीचे उद्घाटन गोकुळचे संचालक चेतन नरके यांच्याहस्ते होणार आहे. माजी नगराध्यक्ष विनोदकुमार चोरडिया आदी उपस्थित राहणार आहेत. २० रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवरायांची स्वराज्य संकल्पना या विषयावर इचलकरंजी समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांचे व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष स्वरूपा पाटील-यड्रावकर यांच्या हस्ते होणार आहे. माजी नगराध्यक्ष डॉ. नीता माने, भाजप युवा मोर्चाचे पृथ्वीराज यादव हे उपस्थित रहाणार आहेत. हे कार्यक्रम पालिकेसमोर असणाऱ्या विक्रमसिंह क्रीडांगणावर होणार आहेत. शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
----------
‘शिवरायांवर वारकरी धर्माची छाप’वर व्याख्यान
शिवरायांवर वारकरी धर्माची छाप या विषयावर हिंगोलीचे शेख सुभान अली यांचे २१ रोजी सायंकाळी सहा वाजता व्याख्यान होणार आहे. यावेळी तहसीलदार अपर्णा मोरे- धुमाळ, डॉ चिदानंद आवळेकर, संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील, संदीप यादव, माजी नगरसेवक लक्ष्मीकांत उर्फ बंडा मिनियार व ॲड. इंद्रजीत कांबळे हे उपस्थित असणार आहेत.