
कोबी पिकावर नांगर
5001
नांदणी: काढणीला आलेल्या कोबी पिकावर नांगर फिरवण्यात आला.
...
शेतकऱ्याने फिरवला कोबी पिकावर नांगर
केवळ एक रुपया किलो दरः नांदणीत एक एकर कोबी जमिनीत गाडला
जयसिंगपूर, ता.७ : बाजारात एक रुपया किलोपर्यंत कोबीचे दर गडगडल्याने अस्वस्थ झालेल्या नांदणी (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने आपल्या एक एकर काढणीला आलेल्या कोबी पिकावर सोमवारी (ता.६) नांगर फिरवला.
नांदणीतील चंद्रकांत बाळू कोळी या शेतकऱ्याने सोमवारी काढणीला आलेला कोबी जमिनीत गाडून टाकला. कोळी हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजीपाला पिकवतात. आपल्या एक एकर उसात आंतरपीक म्हणून त्यांनी कोबीची लागवड केली. यासाठी जवळपास ५० ते ६० हजार रुपये खर्च केले. पाऊण किलो ते किलो इतक्या वजनाचा कोबी काढणीला आला आहे. मात्र बाजारात एक रुपया किलो कोबीचा दर असल्याने नाराज झालेल्या कोळी यांनी उभ्या पिकावर नांगर फिरवला. भाजीपाल्याला दर नसल्यामुळे या आधीदेखील तालुक्यातील भाजीपाला पिकवणाऱ्या गावांमध्ये असे प्रकार घडले आहेत.
भाजीपाल्याला हमीभाव नाही त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सरकारने भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांसाठी निश्चित असे धोरण आखण्याची गरज आहे. जेणेकरून भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागणार नाही. शिवाय दर नसल्याने भाजीपाल्यावर रोटावेटर फिरवावा लागत असेल तर उद्या बाजारात त्याच भाजीपाल्याची टंचाई निर्माण होऊन जादा दराने भाजपला खरेदी करण्याची वेळ ग्राहकांवर येऊ शकते. त्यामुळे भाजीपाल्यासाठी सरकारने हमीभावाचा कायदा करून त्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव द्यावा. अन्यथा येणाऱ्या काळात शेतकरी देशोधडीला लागेल अशी चिंता श्री. कोळी यांनी व्यक्त केली.
....
` काढणीला आलेला कोबी रोटावेटरच्या साह्याने जमिनीत गाडताना खूपच वेदना होत आहेत. सरकारचे धोरण याला कारणीभूत आहे. नोकरदारांना महागाईच्या निर्देशांकाप्रमाणे वाढवून भत्ते दिले जातात. मग जगाच्या पोशिंद्याकडेच मायबाप सरकारचे दुर्लक्ष का? पाकिस्तानसह अन्य देशांची अवस्था आज आपण पाहतोय, याचा तरी धडा किमान शासनाने घ्यायला हवा.
-चंद्रकांत कोळी, कोबी उत्पादक शेतकरी, नांदणी
....
‘रासायनिक खते, औषधे, बियाणे, मजुरी, वीज दरवाढ यांच्या महागाईत दिवसेंदिवस भर पडत असताना आधी खर्च करून पिकविलेला भाजीपाला काढणीला आल्यावर रोटावेटर फिरवावे लागत असेल तर हे सरकारचे अपयश आहे. नोकरदारांचे लाड आणि अन्नदात्या शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ असे चित्र सध्या देशात पाहायला मिळत आहे.
-सागर संभूशेटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी युवा आघाडी