
डॉ. आंबेडकर पुतळाप्रश्नी तोडगा काढा
05041
जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी माजी खासदार राजू शेट्टी, सावकर मादनाईक आदी उपस्थित होते.
-----------
डॉ. आंबेडकर पुतळाप्रश्नी तोडगा काढा
माजी खासदार राजू शेट्टी यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी; आंदोलनस्थळास भेट
जयसिंगपूर, ता. १२: शहरातील क्रांती चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या जागेप्रश्नी निर्माण झालेला वाद दुर्दैवी आहे. यामध्ये मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून व्यापक बैठक बोलावून सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी (ता.१२) आंदोलनस्थळी दिली.
पुतळ्याच्या जागेवरून सध्या वाद सुरू आहे. तो मिटवून हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी रविवारी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. मुंबईत याप्रश्नी बैठक घेण्याबाबत त्यांच्याशी बोलणार आहे. क्रांती चौकात कोर्टाची जुनी इमारत आहे. मात्र येथील बसस्थानकाच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. देशाला घटना देणाऱ्या महामानवाचा पुतळा मुख्य चौकात होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.
क्रांती चौकात असलेल्या जुन्या कोर्टाच्या परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभा करावा या मागणीसाठी आंबेडकरवादी पक्ष व संघटना यांच्याकडून आज तिसऱ्या दिवशी साखळी उपोषण सुरु आहे. माजी आमदार उल्हास पाटील, दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, स्वाभिमानीचे सावकार मादनाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सर्जेराव शिंदे, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष शैलेश आडके, प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दगडू माने, सुजाता शिंदे, माजी नगरसेवक शैलेश चौगुले, बजरंग खामकर, सागर मादनाईक यांनी उपोषणाला पाठिंबा देऊन पुतळा क्रांती चौकातील जुन्या कोर्टाच्या जागेतच झाला पाहिजे, अशी मागणी करीत अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल अशा इशारा त्यांनी दिला.
माजी नगराध्यक्षा डॉ. निता माने, भाजपाचे तालुकाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, संदिप पुजारी, रमेश शिंदे, कैलाश काळे, श्रीपती सावंत, आदम मुजावर, रावसाहेब निर्मळे, सुनिल कांबळे आदी आंदोलनात सहभागी झाले.