राजकीय ताकद आजमावण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजकीय ताकद आजमावण्याची संधी
राजकीय ताकद आजमावण्याची संधी

राजकीय ताकद आजमावण्याची संधी

sakal_logo
By

फोटो देत आहे.
---------------
राजकीय ताकद आजमावण्याची संधी
जयसिंगपूर बाजार समिती निवडणूक; नेत्यांचा लागणार कस

जयसिंगपूर, ता.२७ : जिल्हा परिषद, पंचायत समिती त्यापाठोपाठ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीला विशेष असे महत्त्व आले आहे. राजकीय ताकद आणि प्रतिष्ठा अजमावण्यासाठी नेत्यांना ही एक चांगली संधी असून नेते मंडळी बाजार समितीवर वर्चस्वासाठी तयारीला लागले आहेत.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात दत्त साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार उल्हास पाटील यांनी मोट बांधली होती. जिल्हा बँकेतील पराभवाचे उट्टे काढण्याचे संधी विरोधकांना बाजार समितीच्या निवडणूकीत मिळणार आहे. सध्या तरी सर्वच नेते आणि पक्षांकडून सावध भूमिका घेतली जात असली तरी लवकरच स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे. अंतर्गत बैठकांना प्रारंभ झाला आहे. कोणाला संधी द्यायची? तोलामोलाचा उमेदवार कोण? आगामी निवडणुकांमध्ये त्याचे कितपत योगदान राहील अशा विविध अंगांनी उमेदवारांची चाचणी केली जात आहे.
जिल्हा बँकेचा पॅटर्न आहे तसा राहिला तरी आमदार यड्रावकरांना मात्र बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपची साथ मिळणार आहे ही त्यांची जमेची बाजू आहे. असे असले तरी भाजपच्या उमेदवारांनाही यामध्ये संधी देण्यावरून एकमत करणे गरजेचे ठरणार आहे. आजवर भाजपला बाजार समितीवर फारसे यश मिळवता आले नव्हते. राज्यात सत्ता बदलाचे परिणाम बाजार समितीच्या निवडणुकीवर स्पष्टपणे जाणवणार आहेत. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनाही बाजार समितीवर काम करण्याचे संधी मिळणार आहे.
राज्यातील सत्ता बदलात आमदार यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. याची परतफेड म्हणून चांगला निधीही शासनाने दिला. तालुक्यात कोट्यावधींची कामे मार्गी लागली आहेत. अशी स्थिती असतानादेखील जिल्हा बँकेच्या पॅटर्नमुळे बाजार समितीची ही निवडणूक सर्वांनाच कस लावणारी ठरणार आहे.
....

बिनविरोध हिताचे
जयसिंगपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची सुमारे ६० लाख वार्षिक उलाढाल आहे. खर्च ४५ लाखांच्या आसपास आहे जेमतेम उलाढाल आहे असे असताना निवडणुकीच्या खर्चाचा बोजा बाजार समितीवर पडणार आहे त्यामुळे बाजार समितीचे हित डोळ्यासमोर ठेवून सर्वपक्षीयांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
....

एकूण मतदान (शिरोळ तालुका)
* सेवा संस्था सदस्य- १९१०
* ग्रामपंचायत सदस्य-६६८
* आडते व्यापारी-३५६
* हमाल तोलाईदार-८७
एकूण मतदान-३०२१
....

एकूण जागा
*विकास संस्था-११
* ग्रामपंचायत-४
* आडते व्यापारी-२
* हमाल तोलदार-१