पंख्यांची घरघर थांबेना

पंख्यांची घरघर थांबेना

Published on

पंख्यांची घरघर थांबेना
पाऊस गायबः वाढत्या उष्म्याचा परिणाम

जयसिंगपूर, ता. ११ः चार दिवसांपूर्वी तुरळक पडणारा पाऊसही पूर्णपणे थांबला आहे. परिणामी वातावरणात कमालीचा उष्मा जाणवू लागला आहे. ऐन पावसाळ्यातही उष्मा हटत नसल्याने पंख्यांची घरघरही सुरुच आहे.
पावसाअभावी तालुक्याच्या अनेक गावातील ऊस पिके वाळून गेली आहेत. अखेरच्या टप्प्यातील पिकांना किरकोळ स्वरुपातील पावसाने काहीशी संजीवनी मिळाल्याने बचावली आहेत. लांबलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना घाम फुटला असतानाच वाढत्या उष्म्याने जीवाची काहीली होऊ लागली आहे. जूनच्या अखेरी निर्माण झालेला गारवा उष्म्याने गायब झाला असल्याने आता पुन्हा पंख्यांची घरघर सुरु झाली आहे.
गेल्या आठवड्याभरापासून पावसाने उघडीप दिल्याने उन्ह आणि ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पावसाळा हंगाम सुरू झाल्यापासून एक-दोन वेळचा अपवाद वगळता जोरदार पावसाने हजेरी लावली नाही. शिवाय उन्हाळ्यात उष्म्याचा पारा उच्चांकी पातळीवर गेला होता. याचा मोठ्या प्रमाणात त्रास सोसावा लागला.
मृग नक्षत्रापासूनच पावसाने म्हणावी अशी हजेरी लावली नाही. त्यामुळे सध्या केवळ ढगांची गर्दी आकाशात दिसत आहे. प्रत्यक्षात अद्यापही जमिनीची तहान भागलेली नाही. शहरातील अनेक कुपनलिकांना अद्यापही पाणी उपलब्ध झालेले नाही. मे महिन्याच्या सुरुवातीलाच शहरातील अनेक कुपनलिका पाण्याविना राहिल्या आहेत. शहरातील हॉटेल चालकांना पाणी टंचाईच्या झळा बसल्या आहेत. काही हॉटेल चालकांनी टँकरने पाणी विकत घ्यावे लागले. अशीच काहीशी परिस्थिती औद्योगिक वसाहतींमधील उद्योगांना देखील जाणवली. टँकरच्या साह्याने अनेक प्रकल्पांना पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. पावसाळ्यास सुरुवात झाल्यानंतर कुपनलिकांच्या माध्यमातून मुबलक पाण्याचा उपलब्ध होईल अशी आशा होती. मात्र जोरदार पावसाअभावी अद्याप कुपनलिकांना पाणी लागलेले नाही. दुसरीकडे उन्हाळ्याचा उष्मा अजूनही कमी झालेला नाही. पाऊस नाही आणि वाढत्या उष्म्याने ऐन पावसाळ्यात देखील घराघरातील फॅन आणि एअर कुलर सुरूच आहेत.
----------
मुसळधार पावसाकडे नजरा
वेगवेगळ्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पेरणी आटोपून घेतली आहे. मात्र बियाणांना अंकुर फुटून त्यांनाही आता पाण्याची आवश्यकता भासू लागली आहे. मुबलक प्रमाणात पाऊस झाला तरच हवेत गारवा निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वांच्याच नजरा मुसळधार पावसाकडे लागून राहिल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.