अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर लाखोची उलाढाल

अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर लाखोची उलाढाल

07960
जयसिंगपूर : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी झालेली गर्दी.
--------
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर लाखोची उलाढाल
अनेकांचे गृहप्रवेश ः जयसिंगपूरला सराफ बाजारात गर्दी
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. १० : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदीसह गृहपयोगी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, दुचाकी-चारचाकी खरेदीतून लाखो रुपयांची उलाढाल झाली. अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर शहरात अनेकांनी आपल्या नव्या घरात गृहप्रवेश केला.
शहरातील सराफ बाजारात सकाळपासून खरेदीसाठी ग्राहकांची मोठी गर्दी होती. सोन्याने प्रति दहा ग्रॅम ७३ हजारांचा टप्पा गाठूनही बाजारातील सर्वच दुकाने ग्राहकांनी फुलून गेली. सराफ बाजारातून आजच्या दिवशी मोठी उलाढाल झाली. पारंपरिक दागिन्यांबरोबरच आधुनिक रचनेचे आणि आकर्षक सजावटीचे दागिने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल जाणवला.
पुढील काही दिवस लग्नाचे मुहूर्त नाहीत. त्यामुळे दर कमी झाल्यानंतर सोने खरेदी करण्याकडेही कल होता. सोन्याचे दर कमी होतील या भावनेतून काहींनी केवळ दराची चौकशी करून नजीकच्या काळात दर कमी होईल का याचा अंदाज घेतला. दराच्या उच्चांकामुळे केवळ मुहूर्त साधण्यासाठी अनेक ग्राहकांनी कमी प्रमाणात सोन्याची खरेदी केली.
दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीकडेही ग्राहकांचा कल जाणवला. अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी ग्राहकांनी यापूर्वीच ॲडव्हान्स रक्कम भरून गाड्या बुक केल्या होत्या. शुक्रवारी सकाळी मुहूर्तावर शोरूममध्ये वाहनांचे पूजन करून गाड्या नेल्या. लोन एक्स्चेंज मेळाव्याच्या माध्यमातून ग्राहकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न कंपन्यांनी केला. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर शहरातील अनेक सदनिकांमध्ये अनेकांनी स्वप्नातील घरांमध्ये गृहप्रवेश केला. विधिवत पूजा-अर्चा करूनच हा गृहप्रवेश केला. बांधकाम व्यावसायिकांसह घरमालक, नातेवाईक यांची दिवसभर यासाठी धावपळ उडाली. शहरात ठिकठिकाणी आंब्यांची विक्री केली. सकाळी आंबा खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाली.
....
ऑनलाईन खरेदीकडे कल
अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधण्यासाठी शहरातील अनेक ग्राहकांनी ऑनलाईन खरेदी केली. एसी, कुलरपासून घरगुती वापराच्या अनेक वस्तू ऑनलाईन मागवल्या. एकाच दिवशी या वस्तूंची डिलिव्हरी करायची असल्याने ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्या कंपन्यांची चांगलीच धावपळ झाली.
....
कोकणच्या नावावर कर्नाटक हापूसची विक्री
अक्षय तृतीयेदिवशी आंब्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होणार हे गृहीत धरून शहरातील काही व्यापाऱ्यांनी कोकण हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री केली. कोकण हापूसचे बॉक्स आणि आतमध्ये कर्नाटकी हापूस ग्राहकांच्या माथी मारला. अगदी २२५ रुपये डझनप्रमाणे खरेदी केलेला कर्नाटक हापूस कोकण हापूसच्या नावाखाली सहाशे ते सातशे रुपयांप्रमाणे विक्री केला.
....

सोने-चांदी खरेदी करून अक्षय तृतीयेचा मुहूर्त ग्राहकांनी साधला. पारंपरिक दागिन्यांसह आधुनिक दागिन्यांची विक्री केली. मात्र, सोन्याचे दर चढे राहिल्याने ग्राहकांनी कमी प्रमाणात सोन्याची खरेदी केली. कमी सोने खरेदी केले असले तरी ग्राहकांची संख्या अधिक असल्याने मोठी उलाढाल झाली.

- विनोद मगदूम, मगदूम ज्वेलर्स, जयसिंगपूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com