हुमणीचा प्रादुर्भाव; पिके धोक्यात

हुमणीचा प्रादुर्भाव; पिके धोक्यात

08110
जयसिंगपूर : शेतात सरी सोडून नव्याने पिके घेण्याची तयारी झाली असताना हुमणीचा धोका निर्माण झाला आहे. (छायाचित्र: संदीप खामकर, जयसिंगपूर)

08109
जयसिंगपूर : हुमणी अळी शेतात दिसू लागली आहे.

हुमणीचा प्रादुर्भाव; पिके धोक्यात
शिरोळ तालुका; कृषी विभागाकडून उपाययोजना गरजेच्या
सकाळ वृत्तसेवा
जयसिंगपूर, ता. २ : तालुक्यात हुमणीचा प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी बनला आहे. उसाबरोबर अन्य पिकांना धोका निर्माण झाला असून मशागतीची कामे करून पेरणीसाठी पावसाकडे लक्ष लागले असताना हुमणीचा प्रादुर्भावाचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे.
शिरोळ तालुक्यात अवकाळी पावसानंतर हुमणीचा प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. उभी पिके वाचवण्याबरोबरच नव्याने पेरणी करण्यापूर्वी हुमणीच्या संकटावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. यासाठी तालुका कृषी विभागामार्फत हुमणी नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्‍यांनी शेतात सऱ्‍या सोडल्या असून शेत पेरणीसाठी तयार केले आहे.
अशातच शिरोळ तालुक्यात पेरणीच्या तोंडावर हुमणीचा प्रादुर्भाव होत आहे. दरवर्षी अवकाळी पाऊस पडल्यानंतर हुमणीचे भुंगे जमिनीतून बाहेर पडतात. रात्री कडूलिंब, बाभळ, बोर, चिंचा यांसह इतर झाडांवर एकत्रित होतात आणि या झाडांचा पाला खातात. सकाळ झाल्यानंतर ते परत जमिनीत जातात. त्यानंतर यातील मादी भुंगे जमिनीत अंडी टाकण्यास सुरूवात करते. सर्वसाधारण तीस दिवस जगतात. यातून दररोज दोन अंडी जमिनीत टाकतात. या अंड्यामधून दहा ते पंधरा दिवसानंतर हुमणीची अळी जन्म घेते. एकदा जन्म झाल्यानंतर ही हुमणी अळी आठ महिने जमिनीमध्ये जिवंत राहते. त्यामुळे ऊस, मका, भाजीपाला, भुईमूग, सोयाबीन यांसह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. हुमणी अळीचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण करण्यासंदर्भात रात्री बाहेर पडलेले भुंगे शक्य असल्यास प्रकाश सापळ्याचा वापर करून एकत्रित पकडून नष्ट केल्यास या किडीचा प्रादुर्भाव वाढत नाही.
प्रकाश सापळ्याचा वापर हा या किडीवर रामबाण व प्रतीकात्मक उपाय आहे. भुंगे एकत्रित पकडून नष्ट केल्यास जमिनीत अंडी पडणार नाहीत आणि हुमणी अळीचा जन्म होणार नाही असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे. कृषी विभागाकडून ठिकठिकाणी शेतकऱ्‍यांना हुमणी नष्ट करण्यासाठी प्रात्यक्षिके दाखवण्यात येत आहेत.
....
जैविक कीटकनाशकांचा वापर
जून, जुलैमध्ये मेटारायझीयम आणि अनिसोपली या जैविक कीटकनाशकांचा प्रतिएकरी दोन लिटर या प्रमाणामध्ये सेंद्रिय खताबरोबर किंवा स्लरीसोबत शेतात वापर करावा. ऊस किंवा इतर पिकांमध्ये भुजवटा देताना रासायनिक खताची मात्रा टाकताना प्रतिएकरी दहा किलो तीन टक्के दाणेदार फिप्रोनिल हे कीटकनाशक वापरणे आवश्यक आहे.
....

दृष्‍टिक्षेपात हुमणी
* उभ्या पिकांना धोका
* शेतीची मशागत झाली आता हुमणीचे संकट
* एकत्रित नियंत्रण गरजेचे
* प्रकाश सापळ्यातून नियंत्रण शक्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com