राजू शेट्टी यांची पोस्ट चर्चेत

राजू शेट्टी यांची पोस्ट चर्चेत

माझं काय चुकलं?, शेतकऱ्यांनो तुम्हीही...
राजू शेट्टी यांची पोस्ट चर्चेतः ‘स्वाभिमानी’त सन्नाटा

जयसिंगपूर, ता. ५: ‘माझं काय चुकलं, प्रामाणिक असणं गुन्हा आहे का? शेतकऱ्यांनो तुम्हीही...’ अशी भावनिक पोस्ट स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोशल मीडियावर व्हायरल करत आपल्या उद्विग्न भावना व्यक्त केल्या. ४० ते ८० हजारांच्या मताधिक्याने आपण विजयी होऊ, असा विश्वास त्यांना होता; मात्र शिरोळ तालुक्याच्या होम पिचवरदेखील त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. यामुळे निराश झालेल्या शेट्टी यांनी आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेची ठरत आहे.
शेतकरी चळवळीतून राजू शेट्टी यांनी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात आपली प्रतिमा निर्माण केली आहे. केवळ चळवळीच्या बळावरच जिल्हा परिषद सदस्य, आमदार आणि दोन वेळा खासदारकीपर्यंत त्यांनी मजल मारली. आमदार आणि खासदारकीच्या काळात कार्यकर्त्यांना त्यांनी हत्तीचे बळ दिले. यामुळेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आपली पाळीमुळे रोवली. याआधीच्या पराभवानंतरदेखील त्यांनी चळवळ आणि शेती प्रश्नावरून सरकारशी दोन हात केले होते. २०१९ च्या लोकसभेतील पराभवानंतर त्यांनी मतदारसंघात चांगलीच मशागत केली होती. कष्टाचे फळ मिळेल, अशी भावना त्यांच्यासह स्वाभिमानी कार्यकर्त्यांना होती.
निवडणुकीच्या काळातदेखील मतदारसंघातील बहुतांश गावात त्यांनी सर्वात आधी प्रचार यंत्रणा राबवली होती. मतदार आणि शेतकऱ्यांचा प्रतिसाद लक्षात घेता यावेळी मोठे मताधिक्य मिळेल, असा त्यांना आत्मविश्वास होता. शेतकऱ्यांनी लोकवर्गणीतून त्यांच्या खर्चाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली होती. यातून त्यांना विजयाची मोठी खात्री होती, मात्र मतमोजणीनंतर शेट्टी यांना स्वतःच्या शिरोळ तालुक्यातदेखील पहिल्या क्रमांकाची मते मिळाली नाहीत. अन्य पाच विधानसभा मतदारसंघातदेखील अशीच परिस्थिती राहिली. परिणामी निराश झालेल्या कार्यकर्त्यांनी निकालानंतर सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. शेट्टी यांनी बुधवारी सोशल मीडियावर केलेली भावनिक पोस्ट संघटनेशी बांधील असणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र अस्वस्थ करणारी ठरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com